बेळगाव लाईव्ह : येथील जिल्हा न्यायालय परिसरात मुलभूत सुविधा पुरवाव्यासाठी अश्या मागणीचे बेळगाव बार असोसिएशनतर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली. यासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
बेळगाव बार असोसिएशन ही बेंगळुरूनंतर राज्यातील दुसरी सर्वात मोठी बार असोसिएशन आहे. बेळगाव न्यायालयात सुमारे तीन हजार वकील नियमितपणे सराव करत आहेत. सरकारने वकिलांना ९० ॲडव्होकेट चेंबर्स उपलब्ध करून दिले आहेत, मात्र नियमितपणे सराव करणाऱ्या वकिलांसाठी हे चेंबर्स पुरेसे नाहीत.
वकिलांना आणि याचिकाकर्त्यांना न्यायालयाच्या आवारातील मुलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे जिल्हा न्यायालय आणि नवीन न्यायालय संकुलात विविध कल्याणकारी उपाययोजना आणि विकास कामे उपलब्ध करून द्यावीत. यामध्ये जिल्हा न्यायालय परिसर आणि नवीन न्यायालय संकुलनात अतिरिक्त 500 वकील चेंबर्स बांधाव्यात,
उत्तम विकसित कॅन्टीन सुविधा उभारावी, वकिलांसाठी बार असोसिएशनची केंद्रीकृत अत्याधुनिक इमारत बांधावी, दोन्ही न्यायालय संकुलात पाण्याची सुविधा उपलब्ध करावी, न्यायालय परिसरात सुयोग्य पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्या सदर निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
याशिवाय बेळगाव न्यायालयाला दिडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आमच्या बार असोसिएशनला उत्सव साजरा करायचा आहे. यासाठीही सहकार्य करावे, अशी विनंती या निवेदनातून नूतन बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी यावेळी सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली.