बेळगाव लाईव्ह:भूभाडे वसुलीचा ठेका देताना राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला आहे. प्रकरण न्यायालयात असले तरी अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे महापालिकेला नुकसान झाले आहे. खंजर गल्ली येथील गाळ्यांबाबतही अशीच स्थिती आहे. त्यामुळे या प्रकरणांत ज्या अधिकार्यांनी गैरव्यवहार केला आहे, त्याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तर रहदारीस अडथळा ठरणार्या सन्मान हॉटेलसमोरील आणि फर्स्ट गेटजवळील बॅरिकेडस हटवण्याचाही निर्णय झाला.
महापालिका सभागृहात गुरुवारी महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर वादळी चर्चा झाली.
सभेत प्रामुख्याने भूभाडे वसुलीचा ठेका देताना निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. पण, या निविदा प्रक्रियेतील अटींचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे ठेकेदाराने मनमानी प्रकारे वसुली केली आहे. याशिवाय महापालिकेची अनामत रक्कमही भरली नाही. त्यामुळे स्थायी समिती बैठकीत त्याचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देवून ठेकेदाराने स्थगिती मिळवली आहे. दरम्यानच्या महिनाभराच्या काळात दुसर्या ठेकेदाराला अत्यंत कमी भाड्यात ठेका देण्यात आला. यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
याशिवाय खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केटमध्ये 2022 मध्ये लिलाव करण्यात आला आहे. पण, दुकानदारांकडून अद्याप भाडे वसूल करण्यात येत नाही. यामध्ये अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष आणि संगनमत आहे, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे महसूल उपायुक्त आणि महसूल विभाग व्यवस्थापकांची नगरप्रशासन खाते, लोकायुक्तांकडे तक्रार करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीला आयुक्त पी. एन. लोकेश यांनीही मंजुरी दिली. पण, या अधिकार्यांची आधी महापालिकेने चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर पुढील बैठकीत त्यांची नगरप्रशासन आणि लोकायुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संध्याकाळी सन्मान हॉटेलसमोरील बॅरिकेडचा विषय चर्चेला आहे. या बॅरिकेडसमुळे रहदारीला अडथळा होत आहे. परिसरात अनेक महाविद्यालये आणि शाळा आहेत. त्यामुळे बॅरीकेडस हटवण्याची मागणी नगरसेवक शंकर पाटील यांनी केली. त्यावेळी नगरसेवक रवी साळुंके यांनीही पहिले रेल्वे फाटक याठिकाणी असलेल्या बॅरिकेडसमुळे लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे तेही हटवावेत, अशी मागणी केली. त्यानुसार दोन्ही ठिकाणचे बॅरिकेडस हटवण्यासाठी पोलिसांना सांगण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी झाला होता गोंधळ
महापालिका सर्वसाधारण सभेत विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांनी सत्ताधारी गटावर जोरदार हल्ला चढविला. डोणी यांनी गेल्या वर्षभरात माजी महापौर, उपमहापौर आणि बांधकाम स्थायी समिती अध्यक्षांनी बेळगावचे चंदीगड केले आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करणे आवश्यक आहे. शहरात आता कोणत्याही समस्या नाहीत. सांडपाणी वाहिनीचा प्रश्न मिटला आहे. कुत्र्यांमुळे शहरात चोर्या होत नाहीत. घर मालकही घराबाहेर पडत नाहीत, असा टोला लगावला. डोणी यांची ही उपहासात्मक टीका सत्ताधारी गटाच्या जिव्हारी लागली. रवी धोत्रे, मंगेश पवार यांच्यासह इतर नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.