बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी या गावात मृतदेह स्मशानात ठेवून अंत्यसंस्कारादरम्यान वाद झाल्याचा प्रकार आज घडला आहे. अंत्यसंस्कारावेळी गेलेल्या गावकरी आणि खाजगी जमीनदारांमध्ये झालेल्या वादावादीत मृतदेह स्मशानभूमीत ठेवूनच आंदोलन करण्यात आल्याची घटना घडली आहे.
कावळेवाडी येथील तुकाराम मोरे नामक व्यक्तीचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यानंतर कावळेवाडी येथील स्मशानभूमीत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. यादरम्यान जमीनमालक मनोहर मोरे आणि गावकरी यांच्यात वाद झाल्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेह स्मशानातच ठेवून आंदोलनाला सुरुवात केली.
गेल्या ५०० वर्षांपासून गावकऱ्यांच्या कब्जात असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जमीनमालकांनी विरोध केला. मात्र याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकरी ठाम राहिले. घटनास्थळी अंत्यसंस्कार करण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याने वाद वाढला.
सदर जमीन हि आपल्या मालकीची असून येथे आपण अंत्यसंस्काराला परवानगी देणार नाही, यावर जमीनमालक ठाम राहिले. सदर प्रकरणी न्यायालयाने स्थगिती दिल्याचेही जमीनमालक मनोहर मोरे यांनी सांगितले.
मात्र गावकऱ्यांनी याच ठिकाणी अंत्यसंस्कार उरकले जातील, असा पवित्रा घेतला. यादरम्यान ग्रामीण पोलिसांनी हस्तक्षेप केला. यासंदर्भात ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.