बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज बेळगाव विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे यांची भेट घेऊन महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.
यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात बोलाविण्यात आलेल्या आगामी 21 रोजी विशेष आधिवेशनादरम्यान सीमाप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची होणारी बैठक, शिनोळी येथे नेमण्यात येणाऱ्या विशेष अधिकाऱ्यांसंदर्भात चर्चा, सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या याचिकेसंदर्भात वकिलांची प्रलंबित कामे अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मंगेश चिवटे यांनी, १९ फेब्रुवारी नंतर शिनोळी येथे महात्मा फुले आरोग्य सेवेअंतर्गत सीमावासीयांसाठी विशेष अधिकारी नेमून स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबत गडहिंग्लज प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करून १९ फेब्रुवारीनंतरची तारीख ठरवून कार्यालयाचे उद्घाटन करून कामकाजाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली याचिका आणि याबाबत वकिलांची प्रलंबित कामे याबाबत महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांमार्फत दिल्लीतील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. तसेच सीमाभागातील मराठी पत्रकारांना जाहिराती आणि मान्यतपात्र देण्यासंदर्भातही चर्चा झाली. सीमाभागातील ८६५ गावातील मराठी भाषिकांना आरोग्य सेवेसह शैक्षणिक सुविधा पुरविण्यासंदर्भातही शिष्टमंडळाने मंगेश चिवटे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे रणजित चव्हाण पाटील,प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, विकास कलघटगी,सागर पाटील मनोहर कालकुंद्रीकर आदी उपस्थित होते.