बेळगाव लाईव्ह:महात्मा गांधी नगरविकास योजनेंतर्गत बेळगाव महानगरपालिकेला 200 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बेळगावसह 10 महापालिका क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी महात्मा गांधी नगरविकास योजना 2.0 अंतर्गत 2000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची सरकारची योजना असल्याचे सांगितले आहे.
राज्यातील काँग्रेस सरकारकडून महात्मा गांधी नगरविकास योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. महात्मा गांधी नगरविकास योजना 2.0 या नावाने या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
सदर योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच म्हैसूर, मंगळूर, हुबळी -धारवाड, बेळगाव, कलबुर्गी, केजीएफ, बळ्ळारी आणि तुमकुरचे वसंतनरसपुरा या प्रमुख शहरांजवळील एकात्मिक वसाहतींचा (इंटिग्रेटेड टाउनशिप) विकासही केला जाणार आहे.
महात्मा गांधी नगरविकास योजना 2.0 अंतर्गत जर 2000 कोटी रुपये मंजूर झाले तर त्या निधीचे राज्यातील 10 महापालिकांमध्ये समान वाटप केले जाईल. ज्यायोगे बेळगावला शहरातील विकास प्रकल्पांसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मिळेल. या निधीचा विनियोग आणि प्रकल्पांची अंमलबजावणी याबाबतचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांची चर्चा करून घेतला जाईल.
बेळगावसह राज्यातील 9 ठिकाणी टाऊनशिप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी गेल्या 20 वर्षापासून बेळगावात टाऊनशिप निर्मितीची चर्चा आहे. तेंव्हा ती टाऊनशिप यावेळी तरी होणार का? हे पहावे लागणार आहे.