बेळगाव लाईव्ह:दोन दिवसांपासून बेकायदा गाळ्यांना टाळे ठोकण्याची सुरू केलेली महापालिकेची कारवाई तिसर्या दिवशीही सुरूच राहिली. शुक्रवारी तीन ठिकाणी कारवाई करत दहा गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले.
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि महसूल उपायुक्त गुरूप्रसाद दड्डे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या गाळ्यांत बेकायदा व्यापार करणार्यांवर कारवाई सुरू केली आहे.
तीन दिवसांत तब्बल 31 गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले.आज सकाळी अनगोळ क्रॉस येथील व्यापारी संकुलातील दोन गाळे आणि एका सभागृहाला टाळे ठोकण्यात आले.
त्यानंतर खासबाग मटण मार्केटमधील तीन आणि कोनवाळ गल्ली येथील चार गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले. या गाळ्यांत बेकायदा व्यापार करण्यात येत होता. त्यामुळे गाळ्यांतील साहित्य बाहेर काढून महापालिकेच्या पथकाने ही कारवाई केली.
ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे महापालिकेच्या पथकाकडून सांगण्यात आले. दोन महिन्यांपासून ज्यांनी भाडे भरले नाही, अशांना चलन वाटप करून आठ दिवसांत भाडे भरण्यात यावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आज झालेल्या मोहिमेत महसूल विभागाचे निरिक्षक नंदकुमार बांदिवडेकर यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
आयुक्त अशोक दुडगुंटी आणि महसूल विभागाच्या नूतन उपायुक्तांच्या आदेशानुसार सीबीटी येथील सहा दुकानांना बुधवारीही टाळे ठोकण्यात आले होते. दोन वर्षानंतर पुन्हा ऍक्शन मोडवर आलेल्या मनपा अधिकाऱ्यांनी हि कारवाई अधिक तीव्र करत गुरुवारी पुन्हा बेकायदेशीररित्या कब्जा घेऊन ठाण मांडलेल्या महापालिकेच्या गाळेधारकांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती.
गुरुवारी मनपा अधिकाऱ्यांनी सीबीटी येथील बेकायदेशीर कब्जा घेतलेल्या तब्बल १५ गाळ्यांचा ताबा घेतला आहे. मनपा अधिकाऱ्यांनी अचानक हि कारवाई तीव्र केल्याने अशा दुकानधारकांची भंबेरी उडाली होती सीबीटीसह महात्मा फुले आणि कोलकार मार्केट येथील गाळेधारकांनाही समज देण्यात आली असून आठवड्याच्या आत भाडे भरा, अन्यथा दुकान खाली करा, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.
गाळ्यांचा लिलाव होऊनदेखील त्यांचा ताबा महापालिकेकडे देण्यात आला नव्हता. जुनेच भाडेकरू त्या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून एकही कारवाई झालेली नव्हती. दोन वर्षानंतर पुन्हा या कारवाईला जोरदार सुरुवात करण्यात आली असून गुरुवारी सीबीटी येथील १५ दुकाने ताब्यात घेतली आहेत. याचबरोबर नव्याने लिलावात घेतलेल्या भाडेकरुंना ती दुकाने सुपूर्द करण्यात येणार आहेत.
गुरुवारी सीबीटी येथील गाळ्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर महात्मा फुले आणि कोलकार मार्केट येथे जाऊन थकीत भाडे असलेल्या गाळेधारकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.