Monday, January 20, 2025

/

विकृत प्रियकराने प्रेयसीच्या पतीला दाखवले तिचे खाजगी फोटो

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सहा वर्षांचे प्रेमसंबंध, प्रियकराच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध, प्रेयसीला नकार देत दुसरे लग्न करण्याचा प्रियकराचा सल्ला आणि ऐन लग्नादिवशीच खाजगी व्हिडीओ शेअर करत पुन्हा प्रेयसीचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा विकृत प्रियकर, अशा घडामोडीतून प्रेमाच्या बंधनाला काळिमा फासणारी घटना कित्तूर येथे घडली आहे.

कित्तूर येथील विणकर कॉलनीत राहणारा मुत्तुराज इटगी या युवकाचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तब्बल सहा वर्षे एकत्र राहणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या कुटुंबीयांनी लग्नाला विरोध दर्शविल्यानंतर प्रियकराने माघार घेत तरुणीला दुसरे लग्न करून घेण्याचा सल्ला दिला. सहा वर्षांच्या या नात्याला निरोप देत प्रेयसी दुसरे लग्न करून घेण्यासाठी बोहल्यावर चढली. तरुणीच्या आई-वडिलांनी पैशांची तडजोड करून खानापूर येथील युवकाशी लग्नही करून दिले. मात्र लग्न झालेल्या काही क्षणातच सदर तरुणीच्या नवविवाहित पतीच्या हाती तरुणीच्या प्रियकराने दोघांचे खाजगी व्हिडीओ ठेवले. संतापलेल्या वराने, वराच्या कुटुंबीयांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तरुणीच्या कुटुंबियांसोबत वादावादी घडली. सासरच्या उंबरठ्यावरच नववधूला घरात येण्यास मज्जाव करत माघारी पाठविण्यात आले. या सर्व घटनेत तरुणीचे आयुष्य तर उद्ध्वस्त झालेच शिवाय या प्रकारामुळे तरुणीच्या कुटुंबियांनाहि मोठा धक्का बसला.

आपल्या प्रियकराने केलेल्या विकृत प्रकारामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले या भावनेतून सदर तरुणीने प्रियकराचे घर गाठले. तरुणीला दारात पाहताच प्रियकराच्या बहिणींनी दरवाजा बंद करत तरुणीला बाहेरच थांबविले. मात्र आपल्यासोबत झालेल्या या अन्यायाविरोधात सदर तरुणी आपल्या कुटुंबियांसमवेत रात्रभर प्रियकराच्या दरवाजात आंदोलन करत उभी राहिली. सदर पीडित तरुणी, तरुणीच्या कुटुंबियांना स्थानिक नागरिकांनीही साथ दिली. मात्र कित्तूर पोलीस स्थानकातील पोलिसांनी हे प्रकरण दाखल करून घेण्यास नकार दिला शिवाय पीएसआय या प्रकरणात सकारात्मकतेने प्रतिसाद देत नसल्याचा आरोपही तरुणीने केला. आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या प्रियकराने आपल्या मुलीशी विवाह करावा, अशी मागणी तरुणीच्या पालकांनी केली.

सदर घटनेत प्रियकराने जरी विकृतपणा दर्शविला असला तरी तिन्ही कुटुंबं या घटनेत भरडली गेली आहेत. अलीकडच्या काळात लग्न मोडणे, प्रेमभंग होणे, एकतर्फी प्रेमातून विकोपाचे निर्णय घेणे यासारख्या घटना वाढल्या आहेत. अशा घटना पोलीस स्थानकाच्या स्तरावर सामोपचाराने मिटविल्या जातात. मात्र अशा घटना घडूच नयेत यासाठी तरुण पिढीचे समुपदेशन करणे अत्यावश्यक आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.