बेळगाव लाईव्ह : राज्यातील जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील विविध संघटना आणि जनतेची मागणी लक्षात घेऊन जिल्ह्याचे तीन जिल्ह्यांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे येत्या शुक्रवारी म्हणजेच १६ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील. या दरम्यान चिक्कोडी आणि गोकाक हे नवे जिल्हे म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला या संदर्भात सर्व तपशील देण्याचे निर्देश दिले आहेत.
चिक्कोडी आणि गोकाक तालुक्याचे नवीन जिल्हे व्हावेत अशी मागणी विविध संघटना, संघटनांचे नेते तीन दशकांपासून करत आहेत. बैलहोंगल आणि अथणी हे नवीन जिल्हे प्रशासकीय कारणासाठी घोषित करण्याची मागणीही करण्यात आली आहे. १९९७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे.एच.पटेल यांनी चिक्कोडी आणि गोकाक हे नवीन जिल्हे म्हणून घोषित करण्याची अधिसूचना जारी केली होती. मात्र, बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर मराठीचे वर्चस्व रोखण्यासाठी विविध कन्नड संघटनांच्या दबावामुळे जिल्ह्याचे विभाजन झाले नाही. सरकारी प्रशासनाच्या सोयीसाठी बेळगावचे तीन जिल्ह्यांमध्ये त्रिभाजन करावे.
चिक्कोडी आणि गोकाक तालुक्याला नवीन जिल्हा मुख्यालय करावे. या दोन्ही शहरांमध्ये जिल्ह्याचे मुख्यालय होण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा अभाव आहे, अशी करणे पुढे करत विभाजनाची मागणी विविध संघटनांच्या नेत्यांनी केली होती. विशेष म्हणजे चिक्कोडी आणि गोकाक येथील काँग्रेस, भाजप आणि जेडीएसचे नेतेही हे दोन तालुके नवे जिल्हे म्हणून घोषित करावेत, असे मत व्यक्त करत आहेत.
दरम्यान यासंदर्भात कन्नड संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणताही प्रस्ताव तयार केला नसल्याचे पुढे आले आहे.
बैलहोंगल मतदार संघाचे आमदार महांतेश कौजलगी यांच्याशी दूरध्वनीद्वारे आपण संपर्क साधला असून केवळ प्रसारमाध्यमांवर हि बातमी पसरली असून १६ फेब्रुवारी रोजी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा कोणताही प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी तयार केला नसल्याचे सांगण्यात आले आहे, असे अशोक चंदरगी यांनी स्पष्ट केले आहे.