बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारकडून २०१८ साली गोर-गरिबांना उत्तम आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ‘आयुष्मान भारत आरोग्य योजना’ सुरू करण्यात आली होती.
मात्र ही योजना समर्पकपणे राबविण्यात आरोग्य खात्याकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे निदर्शनात येत असून या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात बेळगाव जिल्हा पिछाडीवर पडला आहे.
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी योजना नोंदणी करण्यात बेळगाव जिल्हा पिछाडीवर पडल्याने अनेक नागरिक या आरोग्य योजनेच्या सुविधांपासून वंचित राहिले आहेत. या योजनेत गोर-गरिबांना सामावून घेऊन लाभ करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य खात्याकडून घरोघरी जाऊन नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नोंदणी कामाला चालना देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्याला ४७.६३ टक्के नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र आतापर्यंत केवळ १३ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. सदर योजनेची जागृती करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जागृती करून नोंदणी करून घेतली जात आहे. ग्रामीण भागात आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नोंदणी करून घेऊन आयुष्मान कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे.
बीपीएल रेशनकार्ड धारकांना राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजनेंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. एपीएल कार्डधारक अथवा बीपीएल कार्ड नसलेल्यांना शेकडा ३० टक्के चिकित्सा खर्च दिला जातो. म्हणजे १.५ लाख उपचार खर्च देण्याची सोय आहे.
यामध्ये सरकारी व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. आधारकार्ड, बीपीएल रेशनकार्ड, मोबाईल क्रमांकाला लिंक असेल तर ओटीपीच्या आधाराने तात्काळ नोंदणी करून दिली जात आहे. यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे, असे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.