बेळगाव लाईव्ह विशेष :जय महाराष्ट्र चौक असा महाराष्ट्राचा उल्लेख असणारा बेळगाव शहरातील अनगोळ भागात असणारा फलक महा पालिका प्रशासनानं हटवला.
गुरुवारी सकाळी कानडी संघटनेच्या मुठभर कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर हैदोस घालून अनगोळ येथील जय महाराष्ट्र चौक येथील जय महाराष्ट्र लिहलेला फलक काढण्यास महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकला होता महा पालिका प्रशासनाने लाडिक हट्ट पुरवत रात्री महापालिकेने तो फलक उतरविला .
अनगोळ येथील फलक हटवण्यासाठी कन्नड संघटनानी महापालिकेसमोर आंदोलन केले होते. दिवसभर स्टंटबाजी करण्यात आली. अखेर महापालिका प्रशासन या कन्नड कार्यकर्त्यांसमोर झुकले असून त्यांनी रात्री तो फलक हटविला. त्यामुळे लोकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे तीन तीन मंत्री नियुक्त करून सीमाभागात वातावरण जैसे थे व सौहार्दतेचे राहावे यासाठी सूचना दिल्या असताना कर्नाटक प्रशासन मात्र गेल्या 66 वर्षा प्रमाणेच मुझोरी करत केंद्रीय मंत्र्यांच्याही सूचनेला वाटण्याच्या अक्षता लावत दडपशाही चालूच ठेवली आहे.
केंद्रात भाजपचे दमदार गृहमंत्री असताना स्थानिक पातळीवर त्यांचा जराही प्रभाव दिसून येत नाही त्यामुळे केंद्राला कर्नाटक प्रशासन जुमानत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काश्मीर सारख्या जटिल प्रश्र्नातही कठोरपणे वागून गृहमंत्र्यांनी प्रभावी कामगिरी बजावली असताना बेळगावात मात्र त्यांची मात्रा चालत नाही असे दिसून येत आहे.
बेळगाव सह सीमावर्ती भागात अश्या दडपशाहीच्या घटना वारंवार घडत असतानाही महाराष्ट्रातील नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत का अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे भाजपचे प्रभावी उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात असताना ज्यांच्या प्रभाव केंद्रातही चालत असताना सीमाभागातील जनतेवर असा अन्याय होतो त्याबद्दल मराठी माणूस वैष्यम्य व्यक्त करत आहे.
मध्यंतरी विधानसभेत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव परिसरातील मराठी माणसाचा जगण्याचा अधिकार विधान सभेत अधोरेखित केला असतानाही महापालिका प्रशासन कुणाच्या इशाऱ्यावर असा निर्णय घेते असाही सवाल उपस्थित केला जात नाही. मतांसाठी गोंजरायचे आणि हक्काच्या वेळी लाथाडायचे अशी कर्नाटकातील सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे. अनगोळ मधील हा फलक जरी जबरदस्तीने काढला असला तरी मराठी माणसाच्या मनावर कोरलेली ही अक्षरे महापालिका प्रशासन कसे पुसणार आहे हा देखील प्रश्न सीमा प्रश्ना सारखा लोंबकळत पडला आहे.