बेळगाव लाईव्ह:कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शुक्रवारी आपला विक्रमी 15 वा अर्थसंकल्प सादर केला असून ज्यामध्ये बेळगाव शहरातील गर्दी कमी करण्यासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या सहकार्याने बेळगाव शहरात 4.50 कि.मी. लांबीच्या एलिवेटेड कॉरिडोरचे बांधकाम केले जाणार आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शहरांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 पासून कित्तूर राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत 4.50 कि.मी. लांबीचा फ्लाय ओव्हर बांधण्याचे नियोजन आहे.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची संकल्पना असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली असून निधीची तरतूद करण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या निकालात काढण्यासाठी हा फ्लाय ओव्हर उभारण्यात येणार आहे. ज्यामुळे भविष्यात वाहनांची वाहतूक सुरळीत होणार आहे. हा फ्लायोवर राष्ट्रीय महामार्गाजवळील संक्रम हॉटेलपासून प्रारंभ होणाऱ्या या महामार्गामुळे अशोक सर्कल, संगोळ्ळी रायण्णा (आरटीओ) सर्कल परिसरासह कित्तूर चन्नम्मा सर्कल परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे.
याखेरीज जिल्हाधिकारी कार्यालय आणि नवे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांना सामावून घेऊ शकेल अशा पद्धतीने या फ्लाय ओव्हरची बांधणी असणार आहे. सदर फ्लाय ओव्हर राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 जवळील संगम हॉटेलपासून सुरू होऊन अशोक सर्कल, संगोळ्ळी रायण्णा (आरटीओ) सर्कल मार्गे कित्तूर राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत असणार आहे.