बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर येथील गायरान जमिनीमध्ये क्रीडांगण (स्टेडियम) उभारण्याच्या सरकारच्या योजनेस समस्त येळ्ळूरवासियांनी आज सोमवारी सकाळी झालेल्या ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शवून तसा ठराव एकमताने संमत केला. तसेच सदर क्रीडांगण अन्यत्र उभारण्याची मागणीही केली.
येळ्ळूर ग्राम पंचायतीच्यावतीने आज सकाळी गावातील श्री चांगळेश्वरी मंदिर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे नोडल अधिकारी म्हणून तालुका मागास समुदाय कल्याण अधिकारी के. बी. देवाप्पगोळ उपस्थित होते. पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या ग्रामसभेमध्ये गावच्या गायरान जमिनीमध्ये क्रीडांगणाला विरोध करण्याचा ठराव मांडून सर्वानुमते संमत करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांच्यावतीने बोलताना माजी ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी क्रीडांगणाच्या विरोधात सर्वानुमते संमत झालेला ठराव तात्काळ येत्या दोन-तीन दिवसात सरकारपर्यंत पाठवण्याची विनंती पीडीओंना केली.
ते म्हणाले की, ठराव सरकार दरबारी पाठवून त्याची ट्रू कॉपी आपल्याकडे ठेवली पाहिजे. जेणेकरून गावकऱ्यांना ग्रामसभेमध्ये मांडण्यात आलेल्या ठरावाची पूर्तता वरपर्यंत झालेली आहे हे समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गायरान जमिनीत पुन्हा कोणी सर्वेक्षणास आल्यास आपल्या भागाचे तलाठी किंवा पीडीओ यांनी ताबडतोब त्याबाबतची माहिती ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना दिली पाहिजे. तुम्ही सरकारशी बांधील असला तरी तुम्ही त्या बाबतीत आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे. आम्हाला वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. गायरान जमिनीतील क्रीडांगणाला आमचं विरोध असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत येळ्ळूरमध्ये क्रीडांगण होणार नाही आणि आम्ही ते करू देणार नाही.
यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचा हा निर्णय आम्ही स्पष्ट केला आहे. खुद्द ग्रामपंचायतचा देखील क्रीडांगणाच्या प्रकल्पाला विरोध आहे. तेंव्हा येळ्ळूर ग्रामपंचायत आणि समस्त येळ्ळूर गावकऱ्यांचा क्रीडांगणाला विरोध आहे असा ठराव आज आम्ही मांडत असून त्याची पुढील पूर्तता केली जावी, असे सतीश पाटील यांनी स्पष्ट केले.
अन्य एका गावकऱ्याने यावेळी बोलताना गावातील मराठी शाळेला जी जागा देण्यात आली आहे, ती गावातील युवकांना क्रीडा स्पर्धा भरविण्यास दिली जावी. त्याचप्रमाणे इंदिरानगर, मराठी शाळा, हरी मंदिर अथवा सरकारी दवाखाना हलविण्यास आम्हा गावकऱ्यांचा विरोध असेल. क्रीडांगणाच्या योजनेस तर आमचा कडाडून विरोध आहे. विकासाला आमचा विरोध नाही. आम्ही देखील त्याबाबती सरकारच्या पाठीशी आहोत. मात्र क्रीडांगणाच्या योजनेमुळे गावाचे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्यामुळे ती योजना अन्यत्र कोठेही राबवावी, अशी मागणी त्या गावकऱ्याने केली.
क्रीडांगणाच्या विरोधातील ठराव मांडण्यात आल्यानंतर नोडल अधिकारी के. बी. देवाप्पगोळ यांनी तो सर्वानुमते संमत झाल्याचे जाहीर केले. तसेच संपूर्ण गावाचा विरोध असल्यामुळे क्रीडांगणाच्या योजनेला तात्काळ स्थगिती देण्याची शिफारस करण्याबरोबरच ग्रामसभेतील ठराव पुढील कार्यवाहीसाठी त्वरेने जिल्हाधिकारी तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे याबाबतीत स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले. आजच्या ग्रामसभेस आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांसह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.