बेळगाव लाईव्ह : भारतीय रेल्वेची बेंगलोर ते बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू होण्यामध्ये कांही तांत्रिक गोष्टींचा अडथळा आहे. तो अडथळा दूर होताच या रेल्वे सेवेचा बेळगावलाही लाभ मिळेल, असे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सांगितले.
शहरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कडाडी म्हणाले की, बेंगलोर ते बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवेच्या बाबतीत वेळेची समस्या येत आहे चांचणीमध्ये निर्धारित वेळेपेक्षा दोन -तीन तास जादा वेळ लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सकाळी बेंगलोरहून बेळगावला आणि सायंकाळी पुन्हा बेळगावहून बेंगलोरला अशी या रेल्वे सेवेची संकल्पना आहे. मात्र कांही तांत्रिक कारणास्तव सदर प्रवासाला वेळ लागत असल्याचे आणि त्यामुळे प्रवाशांना त्रास होणार असल्याचे मला रेल्वे मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत समजले आहे. मात्र आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे खात्याने संबंधित तांत्रिक कारणे स्पष्ट केली आहेत.
बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी पीटलाईनसह रेल्वेसाठी पाणी व विजेची सोय नाही ही ती तांत्रिक कारणे आहेत.
त्यामुळे या कमतरता दूर झाल्यास वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत येऊ शकते असे सांगून विमानसेवेबद्दल बोलताना सुरक्षेच्या कारणास्तव उद्या 26 जानेवारी रोजी बेळगावची विमान सेवा बंद राहणार असल्याची माहिती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी दिली.