बेळगाव लाईव्ह :घाटमाथ्यावर कोकणी भाषेचे संवर्धन करणाऱ्या उजवाड मासिकाच्या रौप्यमहोत्सवासह कोकणी लोकोत्सव आज सोमवारी सकाळी शहरातील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या सभागृहात उत्स्फूर्त प्रतिसादात मोठ्या उत्साहाने पार पडला.
बेळगाव व कारवार धर्मप्रांथाचे बिशप डाॅ. डेरिक फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर रौप्य महोत्सवी सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे क्रीडा युवा ग्रामविकास कला आणि सांस्कृतिक कार्यमंत्री गोविंद गावडे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे व्यासपीठावर बेळगावचे आमदार असिफ (राजू) सेठ, उजवाड मासिकाचे संपादक लुईस रॉड्रिग्ज आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सोहळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उजवाड मासिकाच्या रौप्य महोत्सवी अंकाचे प्रकाशन आणि उजवाड गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात गोव्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी घाटमाथ्यावर कोकणी भाषा समृद्ध करण्यात उजवाड मासिकाने दिलेले योगदान अमूल्य आहे.
कोकणी ही अत्यंत रसाळ संस्कृती पूर्ण संस्कारी भाषा आहे. या भाषेचा स्वतःचा असा एक विशिष्ट गोडवा आहे. घाटमाथ्यावर या भाषेच्या विकासासह संवर्धनासाठी पत्रकार लुईस रॉड्रिग्ज यांनी गेल्या 25 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या उजवाड मासिकाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे असे सांगून घाटमाथ्यावर कोकणीची पताका फडकावत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य लुईस रॉड्रिग्ज यांनी उजवाडच्या माध्यमातून केले आहे असे गौरवोद्गार काढले. आज इंग्रजी जरी जागतिक भाषा बनली असली तरी आपण आपली संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी प्रादेशिक भाषा टिकल्या पाहिजेत, असेही मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले.
आमदार असिफ सेठ यांनी देखील समयोजित विचार व्यक्त करताना कोकणी ही अतिशय गोड आणि रसाळ भाषा असल्याचे सांगून सेंटपॉल्समध्ये शिकताना माझ्या अनेक कोकणी भाषिक मित्रांच्या सहवासात राहून मला या भाषेविषयी जिव्हाळा निर्माण झाला असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात बिशप डाॅ. डेरिक फर्नांडिस यांनीही मार्गदर्शनपर विचार व्यक्त करून उजवाड मासिकाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उजवाड मासिकाचे संपादक लुईस रोड्रिक्स यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मोनिका पीटर डांटस, मिलाग्रीन आंद्रू डिसोजा, डाॅ. मनीषा झेवियर रेगो, ॲड. पल्लवी बस्तू रेगे, रिटा सुंदर भगत, अनामेरी मनवेल बार्देस्कर, नील मॅथ्यू मंतरो, सावियो आगापित परेरा, गॅब्रियल मीनन डिसोजा, अंतोन डिसोजा, अगोस्तीन शाहू बार्देस्कर, अशोक विश्वनाथ पै, गौरीशंकर रमाकांत वेर्णेकर आणि फादर प्रदीप कार्य यांचा ‘उजवाड कोंकणी गौरव पुरस्कार -2024’ देऊन सत्कार करण्यात आला. रौप्य महोत्सवी सोहळ्यास बाळकृष्ण पै गिरगोल रॉड्रिग्ज, मीनल गोसावीस एलिझाबेथ रॉड्रिग्ज आदींसह कोंकणी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रौप्य महोत्सवी उजवाड मासिकाच्या प्रकाशना बरोबरच सदर सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधील कोंकणी हास्य कवी संमेलन आणि गोव्याहून खास आलेल्या कलाकारांचा ‘लोकनाद’ हा बहारदार कोकणी सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांची दाद मिळवून गेला.