Wednesday, December 4, 2024

/

डोंगरावर शाकंभरी पौर्णिमा यात्रेची जय्यत तयारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, केरळ वगैरे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या शाकंभरी पौर्णिमा यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत असून गुरुवार दि. 25 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. सध्या सौंदत्ती यल्लमा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. शाकंभरी यात्रा काळात सौंदत्ती डोंगरावर तब्बल 8 ते 10 लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

शाकंभरी पौर्णिमा यात्रेसाठी प्रचंड संख्येने येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सौंदत्ती श्री रेणुका देवी मंदिर प्रशासनाने संबंधित उपाययोजना हाती घेण्याबरोबरच भक्तांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात्रेनिमित्त पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदीप, पोलीस बंदोबस्त, दर्शन व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

भाविकांना मंदिराबाहेर देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी भव्य एलईडी स्क्रीन दोन ठिकाणी बसविण्यात आले आहेत. तसेच 40 छोट्या तर 5 मोठ्या टाक्यांच्या आधारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. डोंगरावर विविध ठिकाणी पाण्याचे नळ बसवण्यात आले आहेत. स्वच्छतेसाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सौंदत्ती डोंगरावरील सर्व पथदिपांची दुरुस्ती करून संपूर्ण डोंगरावर प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे प्रचंड गर्दी होणारे स्नानकुंड, डोंगरावर येण्यासाठी असलेले 3 तपासणी नाके या ठिकाणी तसेच समाजकंटक व चोरट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

यात्रा काळात डोंगरावर वाहनांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन विविध निर्धारित ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी यात्रा काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने यात्रेदरम्यान भाविकांसाठी वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्याचबरोबर अनेक भाविक पारंपारिक पद्धतीने बैलगाड्या घेऊन यात्रेला येत असतात. त्यांचीही काळजी घेत डोंगरावर जनावरांचा दवाखाना उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी पहाटे 4 ते सकाळी 6:30 आणि सायंकाळी 4 ते 6:30 वाजेपर्यंत अभिषेक पूजा आरतीसाठी मंदिर देवदर्शनासाठी बंद ठेवण्यात येत असते याची नोंद घेऊन भाविकांनी सहकार्य करावे.

मंदिर प्रशासनाने यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक उपायोजना व व्यवस्था केली असून देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भक्तीभावाने आणि शिस्तीने देवीचे दर्शन घ्यावे. यात्रा भक्तीभावात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री रेणुका देवी मंदिराचे कार्यकारी अधिकारी एस. पी. बी. महेश यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.