बेळगाव लाईव्ह :शेतामध्ये खुदाईचे काम सुरू असताना गंभीर जखमी झालेल्या एका नाग सापाचे प्राण अवयव पुनर्रचनेच्या जटील शस्त्रक्रियेद्वारे वाचवण्यात आले आहेत. बेळगावच्या मल्टी-स्पेशालिटी व्हेटर्नरी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ पशुवैद्यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली असून यासाठी त्यांना सापाच्या अंगावर जवळपास 40 टाके घालावे लागले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, व्यवसायाने दुचाकी मेकॅनिक आणि गेल्या 16 वर्षापासून सर्पमित्र म्हणून ओळखले जाणारे केतन जयवंत राजाई यांना गेल्या शुक्रवारी बेळगाव तालुक्यातील केदनुर गावातील एकाने फोन करून शेतात खोदकाम करताना एक साप सापडला असल्याचे सांगितले.
तेेंव्हा केतन यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना पूर्ण वाढ झालेला एक नाग साप खोदकामासाठी वापरलेल्या जेसीबीचे बकेट टूथ लागून गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले. त्या सापाच्या माने कडील आणि शरीराच्या खालील भागाला गंभीर इजा झाली होती.
सर्पमित्र असलेल्या केतन राजाई यांना त्वचा फाटून खोलवर जखम झालेल्या सापाची अवस्था पहावली नाही आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्याचा जीव वाचवण्याचा निर्धार केला. तसेच त्यांनी त्या सापाला एका सुरक्षित बॉक्समध्ये घालून उपचारासाठी काळजीपूर्वक महांतेशनगर, बेळगाव येथील मल्टी-स्पेशालिटी व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये आणून दाखल केले.
त्या ठिकाणी हॉस्पिटलचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एच. बी. सन्नक्की आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव मुल्लट्टी यांनी त्या विषारी सापाला भूल देऊन तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. अवयव पुनर्रचनेच्या या जटील शस्त्रक्रियेवेळी सापाला सामान्यपणे श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याला ऑक्सिजनही देण्यात आला होता.
सदर शस्त्रक्रियेमुळे जखमी नाग साप आता धोक्याबाहेर असून त्याच्या जखमा भरून येण्याबरोबरच त्याला पुर्ववत हालचाल करता यावी यासाठी डॉक्टरांनी त्याच्यासाठी पाच दिवसांची उपचार योजना हाती घेतली आहे. सदर नागसाप सर्पमित्र केतन राजाई यांच्या निरीक्षणाखाली राहणार आहे.