Saturday, May 4, 2024

/

शेट्टरांच्या घरवापसीचे बेळगावच्या राजकारणावर कोणते परिणाम?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय पटलावरील घडामोडींना अधिक वेग आला असून मागील निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी केली आहे. जगदीश शेट्टर यांच्या घरवापसीमुळे भाजप नेतृत्वाला पुन्हा बळकटी मिळाली असून आता बेळगावच्या राजकारणावरही याचे परिणाम दिसण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने नाराज नेत्यांची घरवापसी करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी जगदीश शेट्टर यांनी माजी मुख्यमंत्री वाय. एस. येडियुरप्पा यांच्यासोबत दिल्लीतील भाजपचे मुख्यालय गाठले. आणि पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सात महिन्यांपूर्वी विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने निवडणुकीदरम्यान जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

विधानसभा निवडणुकीत त्यांना हुबळी-धारवाड मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली. परंतु सुमारे ३४ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. जगदीश शेट्टर हे कर्नाटकातील लिंगायत नेत्यांपैकी एक असून हुबळी धारवाड परिसरात त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. बेळगावचे माजी खासदार, माजी रेल्वेमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्याशी त्यांचे कौटुंबिक नाते असल्याने त्यांच्या घरवापसीचा बेळगावच्या भाजप राजकारणावरही परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.जगदीश शेट्टर आणि अंगडी यांचे नाते आहे. तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री कै. सुरेश अंगडी यांचे शेट्टर हे व्याही आहेत.

 belgaum

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना मागील लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र मंगला अंगडी यांना म्हणावा तितका प्रभाव मतदार संघात दाखवता आला नाही निसटता विजय मिळवला होता अडीच वर्षात प्रभाव दाखवता आला नव्हता.

परिणामी आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा मंगला अंगडी यांना उमेदवारी देण्याची शक्यता कमी व्यक्त होत होती. आगामी लोकसभा निवडणुकीत महांतेश कवटगीमठ आणि शंकरगौडा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असतानाच जगदीश शेट्टर यांनी घरवापसी केल्याने पुन्हा मंगला अंगडी किंवा श्रद्धा शेट्टर किंवा जगदीश शेट्टर यांचे पारडे जड झाले आहे असे बोलले जात आहे.Shettar

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून जरी शेट्टरांची घरवापसी झाली असली तरी माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या प्रयत्नातूनच जगदीश शेट्टर यांचेही प्रयत्न यामागे असल्याचे बोलले जात आहे. जगदीश शेट्टर यांनी मुख्यमंत्रीपद तर भूषविले आहेच. शिवाय भाजप राज्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेट्टरांच्या घरवापसीसाठी प्रयत्न करणाऱ्या रमेश जारकीहोळी आणि येडियुरप्पा यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता त्यांच्या घरवापसीमुळे केवळ राज्याच्या राजकारणातच नाही तर बेळगावच्या राजकारणातही मोठा फरक पाडण्याचे चित्र दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपतर्फे महांतेश कवटगीमठ आणि शंकरगौडा हे उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. मात्र जगदीश शेट्टर यांच्यामुळे पुन्हा एकदा मंगला अंगडी यांची उमेदवारी बळकट झाल्याचे चिन्ह दिसत आहे. या निवडणुकीत श्रद्धा अंगडी शेट्टर यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. राजकीय पटलावर कमकुवत असलेल्या मंगला अंगडी यांनी गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात म्हणावी तशी कामगिरी केली नाही, त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप योग्य उमेदवाराच्या दृष्टिकोनातून पिछाडीवर राहण्याची शक्यता होती. मात्र आता भाजपचे दिग्गज नेते असणारे जगदीश शेट्टर यांची घरवापसी झाल्याने जिल्ह्यातील भाजपला बळकटी मिळणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत जगदीश शेट्टर कारवार मतदार संघातून निवडणूक लढविणास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या घरवापसीमुळे बेळगावमधील इच्छुक उमेदवारांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविणे हे मोठे आव्हान असणार, हे निश्चित!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.