बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारने जारी केलेल्या पाच हमी योजनांपैकी एक असलेल्या शक्ती योजनेचा हळू हळू बोजवारा उडताना दिसत आहे. प्राथमिक टप्प्यापासूनच काही ना काही अडचणी, समस्या जाणवणाऱ्या या योजनेचा लाभ एका बाजूला मोठ्या संख्येने महिलावर्ग घेताना दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला या योजनेमुळे नियोजनाअभावी बससेवेवर अतिरिक्त ताण पडताना दिसत आहे.
शक्ती योजने अंतर्गत कर्नाटकातील महिलांना मोफत बसप्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यादिवशी या योजनेचा शुभारंभ झाला, त्या दिवसापासून विविध धार्मिक आणि पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. राज्यभरात सर्वत्र महिलांना मोफत प्रवास देण्यात आल्याने पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची आणि विशेषतः महिला पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे. मात्र याचा अतिरिक्त ताण बसचालक-वाहकांना याचप्रमाणे संपूर्ण बससेवेवर दिसून येत आहे. शनिवार – रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात महिला प्रवासी बसमधून प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. याचा फटका इतर प्रवाशांना बसत असल्याचे दिसून येत आहे. सुट्टी व्यतिरिक्त इतर दिवशीही बेळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात महिलांची वर्दळ दिसून येत आहे. बाजारपेठेत जाण्यासाठीही महिला बसमधूनच प्रवास करत आहेत. परिणामी याचा फटका दररोज सकाळी बसमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर कामगारांना बसत आहे. बसमध्ये महिला प्रवाशांची होणारी मोठी गर्दी अनेकवेळा बस वाहकांना डोकेदुखी ठरत आहे.
11 जूनपासून राज्यात शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. तेव्हापासून महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. सुरुवातीला पावसाळा दरम्यान वर्षा पर्यटनासाठीदेखील प्रवाशांची संख्या वाढली होती. पुन्हा आता डिसेंबर, जानेवारी दरम्यान पर्यटन हंगामासाठी प्रवाशांची संख्या वाढली आहे. सध्या शैक्षणिक सहलींचाही हंगाम सुरू आहे. त्यामुळे धार्मिक आणि पर्यटनस्थळे फुल्ल होऊ लागली आहेत.
परिवहनच्या ताफ्यात बसवाहक, बसचालक आणि बसेसची कमतरता आहे. त्यामुळे विविध मार्गांवर बसफेऱ्या कमी होऊ लागल्या आहेत. त्यातच पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक बस वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे. शक्ती योजनेमुळे महिला परिवहनच्या बसला अधिक पसंती देऊ लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी फिरणाऱ्या महिलांचा अतिरिक्त ताण बससेवेवर वाढू लागला आहे. परिणामी इतर प्रवाशांना बससाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांची यामध्ये फरफट होऊ लागली आहे.
राजहंसगड, भुतरामहट्टी प्राणी संग्रहालय, सौंदत्ती यल्लम्मा, गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी, भीमगड अभयारण्य, सोगल सोमनाथ, चिंचली मायाक्का आदी ठिकाणी जून महिन्यापासून पर्यटकांची संख्या वाढल्याची नोंद आहे.या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी विशेषत: परिवहनच्या बसने प्रवास केला जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बस सेवेवरही पर्यटकांचा अतिरिक्त ताण वाढू लागला आहे. जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना 2023 मध्ये तब्बल 3.95 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. 2024 मध्ये ही संख्या 5 कोटींच्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.