बेळगाव लाईव्ह : नेहरु नगर, बेळगाव येथील रहिवासी
पाचहून अधिक दशके बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे (वय 70) यांचे दीर्घकालीन आजार आणि वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांनी दैनिक पुढारी मध्ये दीर्घ काळ सेवा बजावली होती.
बेळगाव भागात दैनिक पुढारीचे पाय रोवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. बेळगावातील राजकीय, सामाजिक घडामोडीत त्यांचा सहभाग नेहमी असायचा. त्यांच्या निधनाने पत्रकार क्षेत्रातील तारा निखळला आहे.
पत्रकार विकास अकादमी आणि अन्य पत्रकार संघटना स्थापन करण्यात त्यांचे योगदान होते. अनेक युवा पत्रकारांचे ते मार्गदर्शक होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यात ते जेष्ट पत्रकार आणि विचारवंत म्हणून अग्रेसर असायचे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, सहा बहिणी, पुतणे आणि नातेवाईक असा परिवार आहे.रविवारी सायंकाळी 7 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बेळगाव येथील पत्रकारांच्या जुन्या फळीतील अग्रणी नाव म्हणून प्रशांत बर्डे यांना ओळखले जाते. त्यांनी सुरुवातीला इतर दैनिकात तसेच बरीच वर्षे दैनिक पुढारीत केलेल्या पत्रकारितेची नोंद आजही घेतली जाते. त्यांच्या बातमीदारीची, लेखांची चर्चा आजही होताना दिसते.
राजकीय विश्लेषणाच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. असे पत्रकारिता क्षेत्रात बोलले जाते. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या निधनाने बेळगावच्या पत्रकार क्षेत्राची न भरून येईल इतकी हानी झाली आहे.