बेळगाव लाईव्ह :जगदीश शेट्टर आता गेलेत. यापुढे आणखी कोण जाणार माहित नाही. सर्वजण पक्षात राहतील एवढाच आशावाद आम्ही बाळगू शकतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकहोळी यांनी व्यक्त केली.
हावेरी येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, जे जाणार आहेत त्यांना अडवणे आमच्या हातात नाही. जाण्याची मानसिकता निर्माण झाल्यांना अडवता येत नाही.
सर्वजण पक्षात राहतील एवढाच आशावाद आम्ही बाळगू शकतो. आमचाही पक्ष आहे. आमचीही हॉट बँक आहे. स्वतःच्या ताकदीवर राज्यात आम्ही जिंकलो आहोत. त्यांच्यामुळे अधिकारावर आलो, यांच्यामुळे अधिकारावर आलो असे म्हणण्यात अर्थ नाही. आम्ही पक्षाच्या जोरावर जिंकलो आहोत.
जगदीश शेट्टर बेळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार यासंदर्भात बोलताना निवडणुकीत भाजप पक्षातून कोणीतरी उभे राहिलेच पाहिजे. कोणाला उभा करायचे कोणाला नाही हे त्यांचा पक्ष ठरवेल. तो आमच्याशी संबंधित विषय नाही. शेट्टर यांना उभे केल्यास लिंगायत मतांचा लाभ मिळेल असे गणित आहे. काय होतंय निवडणूक आल्यावर बघू, असे मंत्री सतीश जारकहोळी पुढे म्हणाले.
काँग्रेस मधील वातावरण बरोबर नाही असे म्हणणारे शेट्टर मग भाजपला सोडून काँग्रेसमध्ये का आले होते? असा सवालही त्यांनी केला. तसेच आता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्यामुळे आपण त्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.