बेळगाव लाईव्ह :सातबारा उताऱ्यांमध्ये खाडाखोड करून गैरकारभार केल्याप्रकरणी तहसीलदार कार्यालयातील भूमी विभागात कार्यरत असणाऱ्या महसूल निरीक्षक व तलाठ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
महसूल निरीक्षक उदय खातेदार व तलाठी बी. निरंजन अशी कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे असून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी हा आदेश बजावला आहे.
तहसील कार्यालयातील भूमी विभागात महसूल निरीक्षक म्हणून सेवा बजावणारे उदय खातेदार व बडाल अंकलगीचे तलाठी बी. निरंजन या दोघांनी मिळून काकती येथील १० एकर १२ गुंठे तसेच होनगा गावातील १४ एकर १२ गुंठे जमिनीसंदर्भातील मूळ मालकाचे नाव बदलून फेरफार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचे खातेनिहाय चौकशी हाती घेण्यात आली आहे. सदर कर्मचाऱ्यांनी सातबारा उताऱ्यांमध्ये मूळ कागदपत्रांशिवाय फेरफार केला असल्याचे उघडकीस आले आहे. सातबारामध्ये फेरफार केली असल्याचे प्रांताधिकारी शवण नाईक यांच्या निदर्शनास आले होते.
यावरून प्रकरणाची चौकशी हाती घेण्यात आली होती. या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून देण्यात आला होता. त्या आधारे दोन्ही कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निलंबनाचा बडगा उगारला असून खातेनिहाय चौकशीचे आदेश जारी केले आहेत.