बेळगाव लाईव्ह : कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचा यात्रोत्सव सुरु झाला आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कंकण-मंगळसूत्र विसर्जन विधी आणि पौष महिन्यात येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेला चुडी पौर्णिमा असे स्वरूप असणाऱ्या या यात्राकाळात लाखो भाविक सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर यात्रेसाठी रवाना होतात.
पूर्वापार चालत आलेल्या या यात्रेसाठी अनेक वर्षांपासून भाविक बैलगाडीतून डोंगरावर रवाना होतात. बेळगावमधून वडगाव, शहापूर, अनगोळ यासह तालुक्यातील विविध गावातून, गल्लोगल्ली बैलगाडीतून यल्लम्मा डोंगरावर जाण्याचे नियोजन केले जाते. आपल्यासोबत शिदोरी घेऊन यल्लम्मा डोंगरावर जाणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो. सुरुवातीच्या काळात बैलगाडीतून प्रवास करताना अनेक अडचणीही यायच्या. मात्र अलीकडे रस्ते सुधारल्याने बैलगाड्याही पद्धतशीरपणे डोंगरावर पोहोचतात.
वर्षानुवर्षे चालत आली हि परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जाते, हे विशेष. येत्या २५ जानेवारी रोजी यल्लम्मा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी बेळगावमधील विविध भागातील नागरिकांनी प्रस्थान करण्यास सुरुवात केली आहे.
‘उदो गं आई उदो’च्या गजरात आधुनिकीकरणाच्या युगात आजही तितक्याच उत्साहाने आणि भक्तिभावाने नागरिक यल्लम्मा डोंगरावर रवाना होतात. अलीकडे परिवहन मंडळाकडून यात्राकाळात अतिरिक्त बससेवा पुरविली जाते. अनेक नागरिक खाजगी वाहनातूनही प्रवास करून यल्लम्मा येथे श्री रेणुकादेवीचे दर्शन घेतात. मात्र यात्रेसाठी बैलगाडीतून प्रवास करून जाण्याचा अनुभव हा इतर सर्व गोष्टींपेक्षा वेगळा असतो.
बैलगाडीतून प्रवास करून यात्रेला जाणे हे इतर वाहनातून जाण्यापेक्षा अधिक खर्चिक असते. मात्र पूर्वापार चालत आलेली हि परंपरा जोपासण्यासाठी आणि टिकविण्यासाठी बेळगावमधील विविध गल्ल्या, तालुक्यातील गावे हा वारसा पुढील पिढीकडे सोपवत आहेत.
यात्रा भरविणे आणि यात्रा उत्साहात पार पाडणे, यामागे आपल्या पूर्वजांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी विशेष असा उद्देश जोपासला होता. पूर्वी लोक काबाडकष्ट करत, मेहनत करत. बहुजन समाज अधिकाधिक शेती व्यवसाय करत असे. त्यावेळी मनोरंजनासाठी कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. आपल्या दैनंदिन जीवनातून, कामातून थोडा विसावा मिळावा, विरंगुळा मिळावा आणि पुन्हा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कामाची सुरुवात करता यावी, यासाठी यात्रा-उत्सवाचे नियोजन केले जायचे.
चैत्र महिन्यात येणारी जोतिबा डोंगरावरील यात्रा असो किंवा आषाढ महिन्यात पंढरपूर ला होणारी आषाढी एकादशीची वारी असो किंवा मार्गशीर्ष – पौष महिन्यात येणारी सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावरील यात्रा असो या सर्व काळात शेतीकामातून थोडी मोकळीक मिळते. खरीप आणि रब्बी पिकाच्या हंगामी कामातून थोडी विश्रांती मिळावी आणि पुन्हा मशागतीच्या, पेरणीच्या आणि सुगीच्या कामासाठी नवचैतन्य मिळावे, यात्रेच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित यावेत आणि विचारांची, सुख-दुःखाची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने यात्रा-उत्सवाचे नियोजन केले जायचे. मात्र अलीकडे वेगवान युगात हा उद्देश बाजूला हटत चालला आहे.
सध्या प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त झाल्याने सार्वजनिक पद्धतीने सण-वार-उत्सव-यात्रा करणे कमी होत चालले आहे. शिवाय आर्थिक नियोजनाचा भागही यामागचा महत्वाचा घटक आहे. हल्ली प्रत्येकजण आपल्या कुटुंबापुरताच मर्यादित विचार करून सण-वार-उत्सव-यात्रा साजरे करतो. यामुळे अशा गोष्टींमागचा मूळ उद्देश बाजूला जात आहे. कित्येकजण कर्ज काढून असे सण-वार-उत्सव-यात्रा करतो यामुळे अनेकजण आर्थिक अडचणीत फरफटत जात आहेत.
श्रद्धा हि प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्तरावर पाळली जाते. मात्र खऱ्या अर्थाने देव समजून घेऊन अंधश्रद्धेकडे न वळता श्रद्धा आणि भक्ती हे भाव पवित्रपणे जोपासले जाणे गरजेचे आहे.