बेळगाव लाईव्ह :नवी निवृत्ती वेतन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी निवृत्तीवेतन योजनाच लागू करावी, या मागणीसाठी नैऋत्य रेल्वे मजदूर युनियनतर्फे बेळगाव रेल्वे स्थानक आवारामध्ये साखळी उपोषणाच्या स्वरूपात छेडण्यात आलेले आंदोलन आज चौथ्या दिवशी सुरूच होते.
नवी निवृत्ती वेतन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी निवृत्तीवेतन योजनाच लागू करावी, या मागणीसाठी ऑल इंडिया रेल्वेमन्स फेडरेशन (एआयआरएफ), एचएमएस आणि आयटीएफ यांच्याशी संलग्न नैऋत्य रेल्वे मजदूरी युनियनतर्फे बेळगाव रेल्वे स्थानकासमोर गेल्या सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड डॉ ए. एम. डिक्रुझ आणि झोनल अध्यक्ष कॉम्रेड अशोक कुमार व्ही. यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात रेल्वेच्या विविध खात्यातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
आपल्या मागणीची पूर्तता व्हावी यासाठी हे कर्मचारी जोरदार घोषणाबाजी, निदर्शने करून रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी येणाऱ्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
उपोषण स्थळी बेळगाव रेल्वे कर्मचारी संघटनेचे बेळगाव शाखेचे खजिनदार मुरलीधर कदम आपल्या मागणी संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना म्हणाले की, नैऋत्य रेल्वे मजदूरी युनियनचे सरचिटणीस डॉ. ए. एम. डिक्रुझ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शाखांच्या कर्मचाऱ्यांनी आज अखिल भारतीय पातळीवर संप पुकारून आंदोलन छेडले आहे.
या पद्धतीने वारंवार आंदोलन करून देखील सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या 2004 सालानंतर जे कामाला लागले आहेत त्यांना निवृत्तीवेतन नाही आहे. आजच्या वाढत्या महागाई मध्ये पूर्वीच्या जुन्या लोकांना त्यांच्या निवृत्तीवेतनातून उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता नव्याने भरती झालेल्यांना जर निवृत्तीवेतनच मिळणार नसेल तर त्यांचे पुढे कसे होणार? आजकाल वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे.
याला कारण मुलं आई-वडिलांना सांभाळेण्याशी झाली आहेत. अशा परिस्थितीत निवृत्तीवेतन हाच कर्मचाऱ्यांसाठी भविष्यातील आधार आहे. तोच आधार काढून घेतला तर या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीनंतर म्हणजे वयाच्या साठी नंतर आयुष्य जगायचे तरी कसे? त्यासाठी निवृत्तीवेतन हाच मुख्य आधार असल्यामुळे ते मिळावे म्हणून आम्ही वेळोवेळी आंदोलन करत आहोत. आज आम्ही चौथ्या दिवशी आमचे हे लाक्षणिक उपोषण सुरू ठेवले आहे. तरी सरकारने याची दखल घेऊन जुने निवृत्ती वेतन सुरू करावे अशी आमची मागणी आहे, असे मुरलीधर कदम यांनी सांगितले. याप्रसंगी संघटनेचे सहाय्यक सेक्रेटरी यल्लाप्पा मुसलमारी, गोणी, बशीर अहमद आदी उपस्थित होते.