Tuesday, December 3, 2024

/

स्कीम नोकर संघटना, सीआयटीयुचा खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा

 belgaum

बेळगाव लाईव्ह: अंगणवाडी अक्षरदासोह सारख्या विविध योजनांसाठी असलेले अनुदान केंद्र सरकारने बंद करू नये. पुढील अंदाजपत्रकात तशी तरतूद करून हे अनुदान पूर्ववत सुरू करावे या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी, आशा, माध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांनी आज सकाळी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर केले.

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या आश्रयाखाली स्कीम नोकर संघटना आणि सीआयटीयुतर्फे आज मंगळवारी सकाळी उपरोक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. काडा कार्यालयाच्या ठिकाणीच असणाऱ्या बेळगावच्या खासदारांच्या कार्यालयावर काढलेल्या सदर मोर्चामध्ये बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील आरोग्य खात्याच्या योजनांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अक्षरधासोह, अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अक्षरधासोह नोकर संघ संघटना बेळगावचे अध्यक्ष म्हणाले की, आज जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सरकारच्या विविध योजनांतर्गत काम करणारे कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, अक्षरधासोह कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. हे आंदोलन तीन दिवस चालणार आहे. आज पहिल्या दिवशी योजनांअंतर्गत कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दुसऱ्या दिवशी कृषी, औद्योगिक वगैरे अन्य क्षेत्रातील असंघटित कामगार आणि तिसऱ्या दिवशी बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे आंदोलन या पद्धतीने कामगार संघटनेतर्फे तीन दिवस आंदोलन केले जाणार आहे. सध्या आम्ही खासदारांच्या कार्यालयासमोर का आंदोलन करत आहोत तर केंद्र सरकारने विविध योजना अंतर्गत देण्यात असलेले अनुदान बंद केले आहे. तेंव्हा पुढील अंदाजपत्रकात बंद केलेले अनुदान पूर्ववत सुरू करण्याची तरतूद केली जावी, अशी आमची मागणी आहे अशी माहिती देऊन आजच्या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती, बैलहोंगल, कित्तूर, निपाणी, चिक्कोडी, खानापूर वगैरे सर्व तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे अक्षरधासोह नोकर संघाच्या अध्यक्षांनी सांगितले.Anganwadi

यावेळी बोलताना एक महिला कामगार नेत्या म्हणाल्या की, सध्या केंद्र सरकार सर्व क्षेत्रांचे खाजगीकरण करत आहे. शेतात कामाला जाणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी शिशुपालन केंद्र उघडली जात आहेत. सगळी मुले तिकडे गेली तर अंगणवाडी केंद्रात मुले कुठून येणार? अंगणवाडी कार्यकर्त्यांना बीएलओ, भाग्यलक्ष्मी योजना वगैरे अतिरिक्त कामांना जुंपले जात आहे. या पद्धतीने आम्हाला विखरवून अंगणवाडीतून हद्दपार केले जात आहे.

अंगणवाडीची कामे दुसऱ्यांना दिली जात आहेत. हा आमच्यावर अन्याय असल्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो. आम्ही इतके वर्ष काम करूनही आमच्यावर अन्याय का? आमचा पगार कापला जात आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडी आणि माध्यम आहार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पगाराच्या निम्मे निवृत्ती वेतन द्यावे असा न्यायालयाचा आदेश असूनही केंद्र सरकारकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. तेंव्हा ते प्रलंबित वेतन लवकरात लवकर दिले जावे अशी आमची मागणी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.