बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने एपीएमसी येथे उभारलेल्या ओल्या कचऱ्यापासून 200 युनिट वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ आज मंगळवारी सकाळी उत्साहात पार पडला.
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पालिका प्रशासन मंत्री रहीम खान उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कळ दाबून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून कशाप्रकारे गॅस व विजेची निर्मिती केली जाते याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली.
सदर प्रकल्प सुरू होऊन वर्ष झाले असले तरी त्याचे उद्घाटन झाले नव्हते. ते उद्घाटन आज करण्यात आले. शहराचे आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभाप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पालिका प्रशासन मंत्री रहीम खान, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील व मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी हजर होते.
प्रारंभी प्रास्ताविकामध्ये ओल्या कचऱ्यापासून कशा पद्धतीने शहरातील तीन प्रकल्पांद्वारे स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती केली जात आहे याची माहिती देण्यात आली. बेळगाव महापालिकेकडून गेल्या एक वर्षापासून विविध प्रभागातील 500 किलो अर्थात अर्धा टन ओल्या कचऱ्यापासून स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती केली जाते यातून दररोज एक ते दोन व्यावसायिक गॅस सिलेंडर भरले जातात.
ज्याचा पुरवठा इंदिरा कॅन्टीन, चंपाबाई गर्ल्स हॉस्टेल आणि निराश्रीतांच्या केंद्रांना केला जातो. त्याचप्रमाणे एपीएमसी येथील प्रकल्पाच्या माध्यमातून 200 युनिट वीजेची निर्मिती देखील केली जाते. जिचा वापर एपीएमसी परिसरातील सुमारे 75 पथदिपांसाठी केला जातो. ओल्या कचऱ्यापासून निर्मित विजेपासून हे पथदीप रात्रभर परिसर उजळवत असतात. यामुळे या भागातील हेस्कॉमच्या विजेची बचत होते, असे यावेळी सांगण्यात आले.
प्रकल्पाची प्रशंसा करताना मंत्री रहीम खान यांनी संपूर्ण कर्नाटक राज्यात अशाप्रकारचा टाकाऊ अन्न आणि भाजीपाला वगैरे सारख्या ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे संपूर्ण देशातील एपीएमसीमधील हा पहिलाच प्रकल्प असावा. यासाठी मी येथील महापौर, जिल्हा पालकमंत्री, आमदार, उपमहापौर, जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त या सर्वांना धन्यवाद देतो असे सांगितले.
तसेच भविष्यात या पद्धतीच्या प्रकल्पांचा विस्तार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी माझ्या खात्याशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मंत्री खान यांनी सांगितले. याप्रसंगी निमंत्रितांसह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.
पौरकार्मिकांचा नियुक्ती आदेश पत्र वितरण समारंभ उत्साहात
नगर विकास खाते, पालिका प्रशासन संचलनालय बेंगलोर आणि बेळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेळगाव जिल्ह्यातील विविध नगर पालिका आणि महापालिकांमध्ये नियुक्त झालेल्या पौरकार्मिकांना नियुक्ती आदेश पत्र वितरित करण्याचा कार्यक्रम आज मंगळवारी सकाळी उत्साहात पार पडला.
शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिराच्या सभागृहामध्ये शहराचे आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभास उद्घाटक म्हणून राज्याचे पालिका प्रशासन मंत्री रहीम खान हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे यावेळी प्रमुख पाहुणे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह व्यासपीठावर महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, नवी दिल्लीतील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, अशोक पट्टण आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री रहीम खान यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन झाले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात पालिका प्रशासन मंत्री रहिम खान यांनी पहाटेपासून शहर स्वच्छतेच्या कामाला लागणाऱ्या पौरकार्मिकांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांच्या बाबतीत सरकारने घेतलेल्या निर्णयांची आणि योजनांची माहिती दिली. पौरकार्मिकांनो तुम्ही गरीब असला तरी मोठ्या मनाचे आहात खून पसीने की कमाई कोणाची असेल तर ती तुमची आहे. शहरांसह तालुके, गावं आज जी स्वच्छ आणि सुंदर दिसतात त्यामध्ये सर्वात मोठे योगदान तुमचे आहे, असे मंत्री खान म्हणाले.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावेळी समायोचीत विचार व्यक्त केले. येत्या काळात सरकारकडून पौरकार्मिकांसाठी आवश्यक त्या सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच सरकारने तुमच्यावर मोठी जबाबदारी टाकत तुम्हाला सेवेत कायम केल्याचे नियुक्तीपत्र दिले आहे. तेंव्हा तुम्ही उत्तम कार्य करून सरकारचा तुमच्या पालिकेचा नावलौकिक वाढवावा, असे मंत्री जारकीहोळी उपस्थित पौरकार्मिकांना उद्देशून म्हणाले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या भाषणानंतर मंत्री रहीम खान व मंत्री जारकीहोळी यांच्या हस्ते बेळगाव जिल्ह्यातील विविध पालिका नगरपालिका आणि महापालिका मधील पौरकार्मिकांना नियुक्ती आदेश पत्रांचे वितरण करण्यात आले. समारंभास निमंत्रित मंडळींसह अन्य लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि जिल्ह्यातील स्त्री -पुरुष पौरकार्मिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.