बेळगाव लाईव्ह :शांतीनगर, सौंदत्ती येथे गेल्या ऑगस्ट महिन्यात वाटमारी करून लाखोचा मुद्देमाल लंपास करण्याच्या घटनेचा छडा लावण्यात सौंदत्ती पोलिसांना यश आले असून याप्रकरणी 5 जणांना गजाआड करण्याद्वारे त्यांच्या जवळील 8 लाख 68 हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयामध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. गुळेद यांनी सांगितले की, सौंदत्ती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत गेल्या 25 ऑगस्ट 2023 रोजी एका लुटमार वजा दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद झाली होती.
सदर घटनेत शांतीनगर, सौंदत्ती येथे तिघाचौघा अज्ञातांनी एका मोटरसायकल स्वाराला अडवून त्याच्या जवळील सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली होती. याबाबत मोटरसायकलस्वार अशोक बागेवाडी यांनी पोलिसात तक्रार केली होती.
अज्ञातांनी लुटमार करण्यापूर्वी अशोक यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवून त्यांना जखमी केले होते. या प्रकरणाचा सौंदत्ती पोलीस ठाण्याचे पूर्वीचे पोलीस निरीक्षक करुणेश गौडा आणि विद्यमान पोलीस निरीक्षक धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी छडा लावला आहे.
सदर लुटमारीच्या प्रकरणात एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका अल्पवयीन मुलासह चार जण अशा या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. आरोपींकडून सोन्याची चैन, सोन्याचे मनगटी कडे, मोबाईल फोन आणि मोटरसायकल असा एकूण 8 लाख 68 हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणातील प्रमुख आरोपी मोहंम्मद इमाम साहब कल्लेद हा फिर्यादी अशोक बागेवाडी यांच्या परिचयातील आहे. बागेवाडी यांनी यापूर्वी मोहंम्मद याला 15000 रुपये तर कर्जाऊ दिले होते. अशोक बागेवाडी यांच्याकडे भरपूर पैसा आहे हे कर्जाची परतफेड करणाऱ्या मोहम्मद कल्लेद याच्या लक्षात येताच त्याने त्यांना लुटण्याची योजना आखली. या योजनेत त्याने श्री यल्लमा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या आपल्या दोन मित्रांना सामावून घेतले. त्याचप्रमाणे अन्य दोघा जणांना त्याने बागेवाडी यांच्यावर पाळत ठेवण्यास नेमले.
या पद्धतीने व्यवस्थित पाळत ठेवून अचानक हल्ला करण्याद्वारे मोटरसायकल वरून चाललेल्या अशोक बागेवाडी यांना लुटण्यात आल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. सौंदत्ती पोलीस ठाण्याचे पूर्वीचे पोलीस निरीक्षक करुणेश गौडा,
विद्यमान पोलीस निरीक्षक धर्मट्टी, पोलीस उपनिरीक्षक आनंद, पूर्वीचे डीएसपी रामनंगौडा हट्टी, सध्याचे डीएसपी रवी नायक या सर्वांनी या प्रकरणाचा चांगला तपास लावल्यामुळे आरोपींना गजाआड करणे शक्य झाले आहे अशी माहिती देऊन सदर प्रकरणाचा छडा लावून गुन्हेगारांना गजाआड केल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहित केले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ गुळेद यांनी सांगितले.