Friday, January 3, 2025

/

 म. ए. समिती, शिवसेनेचे शरद पवार यांना साकडे

 belgaum

बेळगाव लाईव्ह :निपाणीसह सीमा भागात करण्यात येत असलेली कन्नड सक्ती आणि महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न याची गांभीर्याने दखल घेऊन देशाचे नेते व मराठी भाषिकांचे सहाय्यकर्ते या नात्याने आपण कर्नाटक शासनाला समज देऊन आम्हा सीमावासीयांना न्याय द्यावा, अशी विनंती महाराष्ट्र एकीकरण समिती -शिवसेना निपाणी भाग यांच्यातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारकडून केला जाणारा अन्याय रोखण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती -शिवसेना, निपाणी भाग, निपाणी (जि. बेळगाव) यांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याकडे सहाय्य मागितले आहे. मराठी भाषिक सीमावासीय गेल्या 65 वर्षापेक्षा अधिक काळापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत हे आपणास विधीत आहेच आपल्या पुढाकाराने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्राने हक्क सांगितलेल्या 865 गावांसाठी अनेक योजनांचा लाभ आम्हा दिला जात होता.

जसा सीमावासीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकीसाठी राखीव जागा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, मराठी शाळा, ग्रंथालय यांना मदत इत्यादी. तथापि सत्ता परिवर्तनानंतर सध्या या योजनांना कात्री लावण्याचे सध्याच्या कर्नाटक शासनाने धोरण दिसत आहे. जी महात्मा फुले जन आरोग्य योजना मराठी भाषिकांना महाराष्ट्र शासनाने देऊ केली आहे. त्याला खोडा घालण्याचा येथील अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. कानडीकरणाचा भाग म्हणून मराठी फलकांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू आहे. निपाणी पालिकेवरील वर्षानुवर्षे असणाऱ्या मराठी फलकावर सक्तीने कानडीफलक लावण्यात आलेला आहे.Pawar

हे सर्व प्रकार पाहता सीमावासीय मराठी भाषिकांना त्रास देण्याचे षडयंत्र कर्नाटक शासन रचत आहे. आपण देशाचे नेते व मराठी भाषिकांचे सहाय्यकर्ते, सहानुभूतीदार या नात्याने या सर्व प्रकरणात लक्ष घालून कर्नाटक शासनाला समज देऊन आम्हा सीमावासीयांना न्याय द्यावा ही विनंती. आपले नम्र -महाराष्ट्र एकीकरण समिती, निपाणी भाग, निपाणी. शिवसेना निपाणी व समस्त मराठी भाषिक, असा तपशील राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

निवेदनावर महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, शिवसेना निपाणीचे अध्यक्ष बाबासाहेब खांबे, माजी नगराध्यक्ष प्रा. डॉ. अच्युत माने, युवा समिती अध्यक्ष बंडा पाटील, रमेश निकम आणि शेतकरी संघटना अध्यक्ष प्रा. एन. आय. खोत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.