बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील एपीएमसी आणि जय किसान या दोन्ही भाजी मार्केटमधील व्यापार व्यवस्थित चालावा यासाठी तेथील व्यापाऱ्यांनी परस्पर सहकार्य आणि सौहार्दतेने आपला व्यवहार केला पाहिजे, असा सल्ला जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज सोमवारी सकाळी पार पडलेल्या एपीएमसी भाजी मार्केट आणि जय किसान होलसेल भाजी मार्केटचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या बैठकीत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
मंत्री जारकीहोळी म्हणाले की, कोट्यावधी रुपये खर्च करून एपीएमसी भाजी मार्केटची उभारणी करण्यात आली आहे. तथापि नव्याने स्थापन झालेल्या जय किसान भाजी मार्केटमुळे एपीएमसी भाजी मार्केटवर प्रतिकूल परिणाम होत असून हे टाळण्यासाठी जय किसान मार्केटचे सहकार्य आवश्यक आहे. यामध्ये दिरंगाई झाल्यास दोन्ही भाजी मार्केटचा व्यापार उद्योग बंद पडू शकतो. त्यासाठी दोन्ही भाजी मार्केटने एकमेकांच्या सहकार्य व समन्वयाने मार्गक्रमण करावयास हवे. दोन्ही मार्केट सुरळीत चालली पाहिजेत असे सांगून पुढील दिवसांमध्ये दोन्ही भाजी मार्केट संबंधीच्या समस्या वाढल्यास पुन्हा बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
बैठकीमध्ये एपीएमसी आणि जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी आपापल्या समस्या मांडल्या. त्यावर पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. या खेरीज दोन्ही भाजी मार्केटच्या व्यापारी संघटनांपैकी एका संघटनेने सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तर दुसऱ्या संघटनेने दुपारच्या सत्रात व्यापार करण्या बाबतच्या तोडग्यावर देखील बैठकीत चर्चा झाली.
शहराच्या विस्ताराबरोबरच भाजीपाला आणि अन्य कृषी उत्पादनांची मागणी वाढू लागली आहे. हे लक्षात घेऊन शेतकरी दलाल व्यापारी आणि गाळेधारक या सर्वांचा व्यवहार सुरळीत चालण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल असे मंत्र्यांनी सांगितले. बैठकीस बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, एपीएमसी सचिव गुरुप्रसाद आदींसह एपीएमसी आणि जय किसान भाजी मार्केटचे पदाधिकारी, व्यापारी गाळेधारक तसेच शेतकरीही उपस्थित होते.