बेळगाव लाईव्ह:मराठा समाजाला आरक्षण मिळायला हरकत नाही. मात्र ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिली.
शहरात बेळगाव लाईव्हशी बोलताना महादेव जानकर पुढे म्हणाले की, मुळात ओबीसी समाज हा गरीब आहे आणि त्यांनाच भाकरी कमी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्याच भाकरीतील वाटा कोणी हिसकावून घेत असेल तर ते योग्य नव्हे. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका आहे. मात्र ते ओबीसीच्या कोट्यातून न देता स्वतंत्र खास वेगळं दिलं जावं, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे, असे जानकर यांनी सांगितले.
गेली 16 वर्षे आम्ही येथे क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा राज्याभिषेक साजरा करतो. त्या माध्यमातून 26 जानेवारी रोजी कन्नड वीर करून ठेवलेल्या रायण्णा यांना राष्ट्रीय वीर करण्याची भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाने घेतली आहे. नंदगड येथे पूर्वी कांही नव्हते, मात्र आम्ही ही चळवळ सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी हजारो कोटींची विकास कामे सुरू झाली आहेत.
काँग्रेस, भाजप, निजद या सर्व पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी निधी दिला आहे. त्यामुळे नंदगड येथील रायण्णा यांच्या समाधी स्थळाचा थोडा विकास झाला आहे. क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे कार्य फक्त कर्नाटक पुरते मर्यादित नव्हते तर संपूर्ण भारतासाठी मैलाचा दगड ठरेल असे होते. यासाठी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष दरवर्षी क्रांतिवीर संगोळी रायण्णा जयंती साजरी करत असतो. राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीच्या दोन बैठका दरवर्षी होतात.
त्यापैकी पहिली बैठक आम्ही कर्नाटकात बेळगावला घेत असतो. त्यानुसार आज ती पार पडली आहे. आता उद्या शुक्रवारी 26 जानेवारी रोजी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा राज्याभिषेक सोहळा होणार आहे. कारण याच दिवशी त्यांनी आपले राज्य देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. संगोळ्ळी रायण्णा यांचा जन्म 15 ऑगस्टला आणि मृत्यू 26 जानेवारी रोजी झाला यामागे फार मोठे तत्त्वज्ञान आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या प्रभूतींनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यामध्ये संगोळी रायण्णा यांचे कार्य नेत्रदीपक आहे.
दुर्दैवाने त्यांना इतिहासाच्या पानापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळेच त्यांना प्रकाशात आणण्याचे काम आम्ही करत आहोत असे सांगून राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता आल्यानंतर दिल्लीमध्ये त्यांचे मोठे स्मारक किंवा त्यांच्या स्मरणार्थ एक मोठे भवन उभारण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.