बेळगाव लाईव्ह:दहा वर्षांपूर्वी खडेबाजार पोलिसांनी भाषिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप ठेवून दाखल केलेल्या खटल्यातून म. ए. समितीचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते मधु कणबर्गी यांची न्यायालयाने आज बुधवारी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
गेल्या 2014 मधील लोकसभा निवडणुकीप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा भागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात सामील होण्याची तीव्र इच्छा केंद्रासमोर प्रकट करण्यासाठी कोणत्याही पक्षाला मत न घालता तटस्थ राहून ‘नोटा’ मतदान करण्याचा निर्णय घेतला होता.
यासंदर्भात पत्रके किर्लोस्कर रोडवरील स्वतःच्या दुकानात आणून समितीचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते मधु कणबर्गी नोटाबाबत जनजागृतीचे कार्य करत होते. त्यावेळी खडेबाजार पोलिसांनी त्यांच्या दुकानावर धाड टाकून सर्व पत्रके व अन्य साहित्य जप्त करण्याबरोबरच कणबर्गी यांच्यावर शहरातील कन्नड व मराठी लोकांमध्ये भाषिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला होता. मिळालेल्या माहितीनुसार गेली दहा वर्षे चाललेल्या या खटल्यात सरकारकडून 15 ते 20 साक्षीदार हजर करण्यात आले. तथापि आरोप सिद्ध न झाल्यामुळे सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने आज मधु कणबर्गी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायालयाचा निकाल जाहीर होताच कणबर्गी यांचे कुटुंबीय मित्रपरिवार आणि समिती कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. न्यायालयात मधु कणबर्गी यांच्यावतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. शंकर पाटील, ॲड. कुट्रे यांनी काम पाहिले.
न्यायालयाच्या निकाला संदर्भात बेळगाव लाईव्हकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना मधु कणबर्गी यांनी माझ्यावर खोटा आरोप ठेवण्यात आला असला तरी माझी बाजू खरी न्यायची होती. त्यामुळेच न्यायालयाने मला निर्दोष ठरविले. आता माझ्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाचा खटला देखील निकालात निघावा आणि बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्र सामील व्हावा अशी आपली तीव्र इच्छा असल्याचे सांगितले.
मधु कणबर्गी हे गेल्या 40 हून अधिक वर्षापासून अनवाणी फिरतात जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही असा पण त्यांनी केला आहे असे हे कणबर्गी बेळगाव परिसरात सीमा भागात सीमा तपस्वी म्हणून ओळखले जातात.