बेळगाव लाईव्ह :कारवार लोकसभा मतदार संघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या आजच्या खानापूर तालुक्याच्या दौऱ्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. खानापूर भाजपसह स्थानिक नाराज जनतेनेही त्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
त्याचप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या मतदारसंघाला स्थानिक किंवा बदली उमेदवार द्यावा, अशी मागणी खानापूरच्या जनतेत जोर धरू लागली आहे.
खासदार अनंतकुमार हेगडे परत एकदा लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करत असुन आज त्यांनी खानापूर तालुक्याचा दौरा केला. पाच वेळा खासदारकी भोगलेल्या अनंतकुमार हेगडे यांनी खानापूर तालुक्यातील विकासात्मक कामाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप असून एकदा ते केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा होते.
परंतु त्याचा काडीचाही उपयोग त्यांनी खानापूर तालुक्यासाठी केला नसल्यामुळे त्यांच्याबद्दल संपूर्ण तालुक्यात आणि विशेष करून सामान्य भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजीचा सुर पसरला आहे. यामुळेच खासदार अनंत कुमार हेगडे यांच्या आजच्या खानापूर दौऱ्याला जनतेचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
गेल्या पंचवीस वर्षात अनंतकुमार हेगडे यांनी मोठी मोठी भाषणे करून, मोठ्या मोठ्या वल्गना करण्यापलीकडे खानापूर तालुक्यासाठी काहींही केले नाही.
वरिष्ठांनी यांचा सारासार विचार करून हेगडे यांच्या जागी खानापुर तालुक्यातील स्थानिक उमेदवार किंवा कारवार मतक्षेत्रातील एखाद्या चांगला दुसरा उमेदवार देण्याची मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे. अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वेगळा विचार करावा लागेल, असे उघड उघड बोलले जात आहे.
खानापूर तालुक्यातील जनता लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आतापर्यंत ठामपणे उभी राहिली आहे.
त्यासाठी या वेळेला भाजपाच्या वरिष्ठांनी याचा सारासार विचार करून लोकसभेसाठी खानापूर तालुक्यात भाजपसाठी अनेक वर्ष कार्य केलेले ज्येष्ठ नेते प्रमोद कोचेरी, संजय कुबल, महिला नेत्या धनश्री सरदेसाई किंवा भारतीय जनता पार्टीत नुकतेच प्रवेशलेले बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार अरविंद पाटील यांचा विचार करावा. हे सर्वजण अनंतकुमार हेगडे यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले काम करतील यात शंकाच नाही. त्यासाठी वरिष्ठांनी सर्व गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.