बेळगाव लाईव्ह विशेष: बेळगाव हे असे गाव आहे, ज्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. केवळ इतिहासच नाही तर पुराणकाळाचा वारसा देखील आपल्या बेळगावला लाभला आहे, याची प्रचिती येथील विविध धार्मिक स्थळांकडे पाहून येते. सध्या देशभर राममय वातावरण निर्माण झाले आहे. याच अनुषंगाने बेळगावमधील रामायणाची साक्ष देणारी तसेच विविध धार्मिक स्थळेही रामरंगी न्हाऊन निघत आहेत. बेळगावमध्ये रामायणाच्या पाऊलखुणा असणारी काही धार्मिकस्थळे आहेत, त्यापैकीच एक असलेले म्हणजे पूर्व भागातील कणबर्गी या गावातील श्री रामतीर्थ मंदिर!
बेळगाव शहराच्या पूर्वेकडे असलेल्या कणबर्गी गावाच्या डोंगरावर वसलेले हे मंदिर रामायणातील प्रसंगांचे साक्षीदार आहे. हे ठिकाणही बेळगावमधील इतर ठिकाणांप्रमाणेच पाण्याचे ठिकाण असून हा परिसर श्री राम आणि लक्ष्मणाच्या पदस्पर्शाने पावन झाल्याचे सांगितले जाते. रामायणाच्या काळात प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण याठिकाणी पाणी पिण्यासाठी आले असल्याची आख्यायिका सांगितली जाते. यामुळेच या स्थळाला रामतीर्थ असे नाव पडले असाव. याशिवाय कणबर्गी डोंगरावर हनुमानाची पाऊले देखील आहेत पूर्वीची वडीलधारी मंडळी या पाऊलना जोडून रामाचा इतिहास सांगत असेत.
प्रभू श्रीराम वनवासात गेले आणि सीतामातेचे अपहरण झाले, त्यानंतर सीतामातेच्या शोधात श्रीरामांनी अनेक ठिकाणी भेट दिली. सीतामातेच्या शोधात नाशिकपासून पुढे उत्तर कर्नाटकातील हंपी(किष्किंधा), यासारख्या अनेक ठिकाणावरून बेळगावच्या दिशेने आलेल्या श्रीरामांनी रामतीर्थ येथे वास्तव्य केल्याचे मानले जाते. याठिकाणी श्रीराम आणि लक्ष्मणाने पाणी पिण्यासाठी विसावा घेतल्याचीही आख्यायिका आहे. रामायणाच्या काळापासून रामतीर्थ येथे मंदिर असल्याचे मानले जाते.
हिंडाल्को कंपनीच्या मागील बाजूला आणि ऑटोनगर पासून कणबर्गी येथील डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर वसले असून याठिकाणी अनेक झरे आहेत. या झऱ्याचे पाणी रामतीर्थ येथे असलेल्या कुंडामध्ये पडते. याठिकाणी २ पाण्याचे कुंड असून महत्वाची बाब म्हणजे या कुंडात बारमाही पाणी वाहते. प्राचीन काळातील हे मंदिर असून या मंदिरात श्रीराम-लक्ष्मण आणि सीतामातेची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे.
या मंदिरात नेहमीच भक्तांची वर्दळ असते. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. रामनवमीच्या निमित्ताने या मंदिराचा वार्षिकोत्सव साजरा केला जातो. तसेच या मंदिराच्या परिसरात उपलब्ध असलेल्या २ कुंडांमध्ये मुबलक पाणी असल्याने ज्याज्यावेळी कणबर्गी गावातील नागरिकांना पाण्याची कमतरता भासते, त्यावेळी येथील कुंडातील पाण्याचा वापर नागरिक करतात.
मंदिराच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर मनाला दिलासा देणारा आहे. सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असून श्रीराम-सीतेच्या मंदिरांसह मंदिर परिसरात शिवलिंग, लक्ष्मी नारायण मंदिर तसेच विविध देव-देवतांची मंदिरेही आहेत. हे मंदिर महानगरपालिकेच्या अखत्यारीत असून या स्थळाला रामतीर्थ असे संबोधले जाते.
रामायणाच्या काळात राम-लक्ष्मण, सीता आणि हनुमानाने ज्या ज्या ठिकाणी प्रवास केला, त्या ठिकाणांमध्ये बेळगावचाही उल्लेख आहे. याच ठिकाणांपैकी एक असलेले हे रामतीर्थ! या परिसराला पुराणकाळाचे महत्व असून येत्या २२ तारखेला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरही उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.