बेळगाव लाईव्ह विशेष : संपूर्ण देशभरात रामानामाचा अखंड जागर सुरु आहे. अयोध्येत निर्माण केलेल्या श्रीराम मंदिराच्या भव्य-दिव्य आणि ऐतिहासिक अशा उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामायणातील सर्व प्रसंग पुन्हा एकदा जागृत होत आहेत.
रामायणातील विविध प्रसंग, विविध व्यक्तिमत्व, रामायणातील पात्रांनी ज्या ज्या ठिकाणी वास केला ती ठिकाणे यासारख्या अनेक गोष्टींना देशभरात उजाळा मिळत आहे. ज्या ज्या ठिकाणी रामायणाची साक्ष आहे त्या त्या ठिकाणी रामभक्तीत भक्त लीन होताना दिसत आहेत. रामायणाच्या काही पाऊलखुणा बेळगावमध्येही आढळून येतात. यापैकीच एक असलेले ठिकाण म्हणजे शहरात गोवावेस नजीक असलेले जक्केरी होंडा!
रामायणाच्या काळात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमानासोबत जनककन्या सीतामातेचेही याठिकाणी वास्तव्य असल्याचे मानले जाते.
सध्याचे जक्केरी होंडा म्हणून परिचित असलेले हे ठिकाण पुर्वाश्रमी ‘जानकी होंड’ या नावाने ओळखले जायचे. कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन जक्केरी होंडा, जक्केरीहोंडा या नावाने हे ठिकाण ओळखले जाऊ लागले. सध्या हा परिसर महानगरपालिकेच्या
याठिकाणी सीतामातेचे वास्तव्य होते अशी मान्यता आहे. याठिकाणी असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे सीतामातेने स्नानासाठी या भागात वास्तव्य केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रामायणाच्या काळात सीतामातेने याठिकाणी वास्तव्य केले यामुळेच या ठिकाणाला ‘जानकी होंड’ असे नाव पडले असावे. होंड हा शब्द कन्नड भाषेतील आहे. पाण्याच्या ठिकाणाला कन्नड भाषेत होंड असे संबोधले जाते. जक्केरी होंडा हा भाग पाणथळ आहे. याठिकाणी अनेक झरे आणि पाणथळे असल्याचे सांगितले जाते. काही दशकांपूर्वी या भागात पाणी होते. मात्र कालांतराने याठिकाणी सिमेंटचे जंगल वाढले आणि येथील पाणथळ जागा नष्ट झाली.
गोवावेस जक्केरी होंडा येथे असलेल्या आर्ष विद्या आश्रमाचे कुलपती स्वामी विजयेंद्र शर्मा यांनी अलीकडेच ‘बेळगाव लाईव्ह’ ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान हि माहिती दिली आहे. स्वामी विजयेंद्र शर्मा यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरविण्यात खारीचा वाटा उचलला होता.
रामायणाची साक्ष देणारे हे ठिकाण बेळगाव शहराच्या कुशीत वसले आहे. मात्र, या ठिकाणाकडे महानगरपालिकेचे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. हा परिसर पाणथळ असल्याने पावसाळ्यात नेहमीच याठिकाणी समस्या उद्भवते. या भागात साचलेले पाणी पुढे शास्त्रीनगर भागात शिरते आणि तेथील जनजीवन विस्कळीत होते. जक्केरी होंडा भागात असलेल्या तलावाकडे वर्षातून एकदाच महानगरपालिकेचे लक्ष जाते.
श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी हा परिसर स्वच्छ केला जातो. मात्र वर्षभर याठिकाणी कचऱ्याचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असते. तलावाशेजारी निर्माल्य टाकण्यासाठी कलशाच्या सुबक आकारातील मोठ्या पात्राचे नियोजन देखील करण्यात आले आहे. मात्र नागरिक तलावात कचरा टाकण्यास प्राधान्य देतात! नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे आणि वेळोवेळी या तलावाची आणि परिसराची स्वच्छता न झाल्यामुळे तलावातील पाण्यावर हिरवा थर साचलेला पाहायला मिळतो. हि बाब येथील रहिवाशांसाठी धोकादायक आहे.
रामायणाच्या काळाची साक्ष देणारे हे ठिकाण बेळगावच्या कुशीत वसले आहे. आज देशभर प्रभू श्रीरामचंद्रांच्या आगमनाची भव्य तयारी सुरु आहे. बाबरी आणि राम मंदिर या वादावर ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी झाली. वनवासातून आलेल्या श्रीरामाच्या विजयाप्रमाणेच राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा देशवासियांना लागली आहे.
राममंदिर जरी अयोध्येत असले तरी या मंदिर उदघाटनाचा सोहळा देशभरातील प्रत्येक घरोघरी, गावोगावी आणि गल्लोगल्ली विविध उपक्रमांच्या माध्यमातून, तितक्याच उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व देवस्थाने उजळून निघाली आहेत. मात्र बेळगावमधील रामायणाची साक्ष देणारे राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा आपली जुनी ओळख नव्याने निर्माण करण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.