बेळगाव लाईव्ह :माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या भाजपमधील पुनर्प्रवेशाचे स्वागत आहे. शेट्टर यांचा भाजपमधील पुनर्प्रवेश पक्षासाठी आणि स्वतः त्यांच्यासाठी तसेच राज्यातील जनतेसाठी हितावह ठरणार आहे, असे मत राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी व्यक्त केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये गेलेल्या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या संदर्भात आज गुरुवारी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये असंतुष्ट वातावरण असून आजच माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे एकेकाळचे राज्याध्यक्ष जगदीश शेट्टर हे पुन्हा भाजपमध्ये सामील झाले आहेत. शेट्टर यांचा परिवार पूर्वीपासूनच भारतीय जनता पक्ष सोबत आहे.
पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी व त्यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. त्यामुळेच विचारधारा वेगळी असलेल्या शेट्टर यांना काँग्रेसमध्ये जुळवून घेता आले नाही. त्यासाठीच पुन्हा ते भाजपमध्ये सामील झाले आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करत आहोत. शेट्टर यांचा भाजपमधील पुनर्प्रवेश पक्षासाठी आणि स्वतः त्यांच्यासाठी तसेच राज्यातील जनतेसाठी हिताव ठरणार आहे.
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या पुनर्निर्मानानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झालं की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. त्यामुळेच देशवासीयांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्यामुळेच जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थेत आपला देश पाचव्या क्रमांकावर असून येत्या काळात आम्ही तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याचा विचार करत आहोत. थोडक्यात आपला देश नरेंद्र मोदी यांच्या हातात राहिला तरच सुरक्षित व चांगला राहील असे लोकांना वाटते. त्यासाठीच आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. त्याकरिता येत्या निवडणुकीपूर्वी बरीच राजकीय स्थित्यंतर घडत आहेत, बरेच लोक भाजपमध्ये सामील होत आहेत. कोणतीही ऑफर न देता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वजण संघटित होत आहेत. कर्नाटकात सध्या घडणाऱ्या घडामोडींमुळे काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. काँग्रेस आमदारांना त्यांच्या विकास कामांसाठी निधी मिळेनासा झाला आहे. मुख्यमंत्री आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाहीत.
त्यामुळेच संबंधित आमदार काँग्रेसमध्ये राहायचे की नाही? याचा विचार करू लागले आहेत. म्हणूनच मी म्हणालो होतो की राज्यातील काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये अजित पवारही आहेत आणि एकनाथ शिंदे देखील आहेत. ते केंव्हाही आपल्या पक्षाला रामराम ठोकून बाहेर पडू शकतात आणि तसे घडले तर कर्नाटकच्या राजकारणात मोठे स्थित्यंतर घडेल, असे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी शेवटी स्पष्ट केले.