बेळगाव लाईव्ह :धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाच्या पुढाकाराने आसपासच्या गल्ल्यांतर्फे उद्या सोमवारी 22 जानेवारी रोजी हेमू कलानी चौकात श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा विविध कार्यक्रम तसेच गुजराती, राजस्थानी, पंजाबी व महाराष्ट्रीयन व्यंजनांच्या वाटपाने उत्साहात साजरा केला जाणार आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत उद्या सोमवारी सकाळी सर्वप्रथम पाटील मळा, मुजावर गल्ली, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, पाटील गल्ली आणि कांगली गल्लीमध्ये रस्त्यावर दीपावली प्रमाणे भव्य रंगबिरंगी रांगोळ्या घालण्यात येणार आहेत. त्यानंतर हेमू कलानी चौकात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना करून पूजाअर्चा, आरती वगैरे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या नागरिकांसाठी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ढोकळा जिलबीसह गुजराती अल्पोपहाराची सोय केली जाणार आहे. चौकात अयोध्या राम जन्मभूमीतील सोहळ्याचे लाईव्ह टेलिकास्ट पाहण्याची सोय देखील केली जाणार आहे. याखेरीज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत उपस्थितांसाठी 56 भोग (मोहन भोग) राजस्थानी व्यंजनाची व्यवस्था असेल. त्यानंतर दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत छोले-बटोरे या पंजाबी व्यंजनांचे वाटप केले जाणार आहे. उपरोक्त कालावधीत सरबत, कालाखट्टा, चहा, कॉफी वगैरे पेयांचे वितरण अवरीत सुरूच राहणार आहे.
हेमू कलानी चौकात शेवटी सायंकाळी 7 वाजता भजनासह ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर रात्री 8 वाजता पुरणपोळीचा महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत असणार आहे.
एकंदर बेळगावमध्ये उद्या एकता युवक मंडळाच्या पुढाकाराने पाटील मळा, मुजावर गल्ली, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, पाटील गल्ली आणि कांगली गल्लीतील नागरिकांकडून कलानी चौकात शहरातील श्रीराम भक्तांना गुजराती, राजस्थानी, पंजाबी व महाराष्ट्रीयन व्यंजनांचे वाटप करण्याद्वारे अयोध्येतील श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचा अत्यानंद प्रकट केला जाणार आहे.