बेळगाव लाईव्ह :खासबाग, जुने बेळगाव स्मशानभूमी शेजारी असलेल्या आपल्या शेत जमिनीतील 5 गुठ्यांमध्ये नवी गल्ली शहापूर येथील शेतकरी अजित कृष्णाजी शिंदे यांनी घेतलेले ‘पौर्णिमा व्हाईट’ अर्थात शेवंती फुलांचे भरघोस पीक परिसरात सध्या कौतुकाचा विषय झाले आहे.
अजित कृष्णाजी शिंदे हे शहापूरसह खासबाग, जुने बेळगाव परिसरामध्ये एक अनुभवी शेतकरी म्हणून सुपरीचीत आहेत. त्यांनी सध्या आपल्या शेतजमिनीत शेवंती (पौर्णिमा व्हाईट) फुलांचे पीक घेतले आहे. येरगट्टी येथून तीन महिन्यांपूर्वी 2 रुपये दराने खरेदी करून आणलेल्या रोपांची लागवड करून त्यांनी हे पीक घेतले आहे.
शेवंती फुलांच्या लागवडीसाठी खरे तर उष्ण हवामानाची गरज असते. त्यामुळे समशीतोष्ण थंड हवामानाच्या बेळगाव परिसरात या फुलांचे पीक घेतले जात नाही. बेळगावच्या आसपास 30 कि. मी. अंतराच्या परिघाबाहेर या फुलांचे पीक घेतले जाते. मात्र यंदा पाऊस कमी असल्याने की काय कुणास ठाऊक शेतकरी अजित शिंदे यांनी घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले आहे. सध्या शिंदे यांच्या 5 गुंठे जमिनीत पिवळसर सफेद शेवंती फुलांचे भरघोस पिक आल्याचे पहावयास मिळत आहे. मेहनती बरोबरच आपल्या जुन्या अनुभवाचा जोरावर शिंदे यांनी हे शक्य करून दाखविले आहे.
ठिंबक सिंचन करून व प्लास्टिक आवरण घालून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मी हे शेवंती फुलाचे पीक घेतले आहे. सध्या या फुलांसाठी मला 120 ते 180 रुपये दर मिळत आहे. या फुलांच्या रोपाला 2-3 महिन्यात फुले येऊ लागतात आणि त्यांचा बहर 5-6 महिन्यापर्यंत असतो.
या परिसरात इतर कोणी असे पीक घेत नाही अशी माहिती देऊन ज्यांना असे पीक घ्यायची इच्छा आहे त्यांना मी आवश्यक ते सहकार्य, मार्गदर्शन करण्यास तयार आहे, असे अजित शिंदे यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. सध्या खासबाग, जुने बेळगाव परिसरात शिंदे यांचे बहरलेले शेवंती (पौर्णिमा व्हाईट) फुलांचे पीक प्रशंसा व कौतुकाचा विषय झाले आहे.