बेळगाव लाईव्ह :अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर सांस्कृतिक भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून ” पाचव्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी हे एक दिवसीय साहित्य संमेलन मराठा मंदिर मध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती राज्याध्यक्ष रवी पाटील यांनी दिली.
यावेळी डी. बी. पाटील यांच्या फोटो स्टुडिओच्या कार्यालयामध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अँड. सुधीर चव्हाण हे होते.
प्रारंभी उपाध्यक्ष डी. बी. पाटील यांनी उपस्थित त्यांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला . त्यानंतर रवी पाटील यांनी संमेलनाबाबतची सविस्तर माहिती दिली.
संमेलन तीन सत्रा मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले असून सकाळी दत्त मंदिरापासून मराठा मंदिर पर्यंत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात ठरले आहे. पहिल्या सत्रामध्ये उदघाटन समारंभ तसेच अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. दुपारी स्नेहभोजनानंतर ‘महाराष्ट्राची लोकधारा लोककलेतून प्रबोधन व मनोरंजन ‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे .
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनीही बैठकीला मार्गदर्शन केले. रणजीत चौगुले यांनी आभार मानले. या बैठकीला शिवसंत संजय मोरे, एम. वाय. घाडी ,संजिवनी खंडागळे, गीता घाडी, सूरज कणबरकर, स्वप्निल जोगानी, गणेश दड्डीकर, मोहन अष्टेकर, परशराम काकतकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते .