बेळगाव लाईव्ह :येत्या मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. यासाठी बेळगाव जिल्ह्यात 128 ड्रोन कॅमेरे तैनात केले जाणार आहेत.
येत्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 128 परीक्षा केंद्रांवर दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार आहे. बेळगाव जिल्ह्यात 40 हजारहून अधिक विद्यार्थी -विद्यार्थिनी ही परीक्षा देणार आहेत.
शिक्षण खात्याने दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू केली असून परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरासह ड्रोन कॅमेराची नजर ठेवली जाणार आहे.
राज्यातील विविध परीक्षा केंद्रांमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्यासह इतर प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याने या वर्षापासून दहावीच्या परीक्षेवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.