Saturday, January 18, 2025

/

…अन्यथा त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतील -खा. धैर्यशील माने

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव मधील मराठी बांधव श्रीरामाचा पुरस्कार, त्यांना अभिवादन स्वतःच्या भाषेत करत असतील तर त्यात गैर काय आहे? श्री प्रभू रामचंद्र हे कांही फक्त मराठी बांधवांचे नव्हे ते संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे. यासाठीच म्हणून कर्नाटक शासनाने मराठीतील श्रीरामांचे फलक उतरविण्याच्या बेळगावमधील कृतीविरुद्ध कडक पावले उचलावीत अन्यथा त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतील, असा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर सागर पाटील आणि कपिल भोसले यांचा कपिलेश्वर उड्डाण पुलावरील अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन व प्रतिष्ठापना सोहळ्यासंदर्भातील शुभेच्छा फलक काल प्रशासनाकडून हटविण्यात आला. कर्नाटक प्रशासनाच्या या कृतीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना हातकणंगलेचे (महाराष्ट्र) खासदार धैर्यशील माने यांनी उपरोक्त इशारा दिला. ते म्हणाले की, अयोध्येतील श्री राम जन्मभूमीच्या ठिकाणी येत्या 22 जानेवारी रोजी श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना आणि श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

अशा या पवित्र सोहळ्याला संपूर्ण देशासह जगभरात प्रभू श्रीराम बद्दलची अस्मिता त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी ठीकठिकाणी सर्वसामान्य लोक आपल्यापरीने विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रम राबवत आहेत. मात्र कालच मला मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक सरकारने बेळगाव मधील मराठी बांधवांनी जे श्रीरामाचे फलक लावले होते आणि त्याखाली फक्त मराठीत श्रीराम लिहिलं म्हणून ते फलक उतरविले. जातीधर्मा पलीकडे पाहण्याची आपल्या देशाची संस्कृती आहे. त्यामुळे कर्नाटकातील शासन, प्रशासनाने इतके दडपशाहीचे, एखाद्या भाषिकांविषयी द्वेष असण्याचे कारण नाही.Dhairyasheel

भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. सर्व जाती-धर्म आणि भाषांनी नटलेला आहे. त्यामुळे तेथील मराठी बांधव श्रीरामाचा पुरस्कार त्यांना अभिवादन स्वतःच्या भाषेत करत असतील तर त्यात गैर काय आहे? आणि हे जर तेथील शासनाला समजत नसेल तर निश्चितपणे महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्यांमध्ये असेल अशा वृत्तीचा आम्ही सर्वजण धिक्कार करतो.

सामाजिक सलोखा जपला पाहिजे. सामाजिक सद्भावना जपली पाहिजे. त्याचबरोबर भाषिक प्रांतवाद यामध्ये न पडता प्रभू श्री राम हे जाती-पाती, भाषे पलीकडचे आहेत. ते समस्त बहुजन समाजाचे आहेत आणि तशा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या मंदिराची उभारणी करत असताना संपूर्ण देश या ठिकाणी एकसंधपणे काम करत आहे. तेंव्हा माझे कर्नाटक सरकारला सांगणं आहे की जर प्रशासन चुकीच्या पद्धतीने कार्य करत असेल तर वेळीच त्या प्रशासनाची कान उघडणी करावी.

ते जमत नसेल तर तुम्ही सुद्धा श्रीरामाचा अपमान करत आहात. धार्मिक भावनेचा अपमान करत आहात. श्री प्रभू रामचंद्र हे कांही फक्त मराठी बांधवांचे नव्हे ते संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे. यासाठीच म्हणून कर्नाटक शासनाने मराठीतील श्रीरामांचे फलक उतरविण्याच्या बेळगावमधील कृतीविरुद्ध कडक पावले उचलावीत अन्यथा त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतील, असा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी शेवटी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.