बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनाच उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी शहापूरसह बेळगाव दक्षिण मधील युवा नेते अहमद रेश्मी यांनी केली आहे.
मंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी गेल्या कित्येक दिवसांपासूनची जनतेची मागणी आहे. त्यांचे हितचिंतक समर्थक आणि कार्यकर्त्यांची देखील सतीश जारकीहोळी यांनाच उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी इच्छा आहे.
बेळगाव दक्षिण मधील युवा नेते अहमद रेश्मी यांनी देखील तशी मागणी केली आहे. जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी हे काही राजकारणात नवीन नाहीत. गेल्या 25-30 वर्षात कर्नाटकच्या राजकारणात त्यांनी आपली अशी वेगळी प्रतिमा, वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारी आणि नव्या दमाच्या युवा पिढीला प्रोत्साहन देणारी ही व्यक्ती आहे. आजपर्यंत कोणतेही पद न मागता त्यांना मिळाले असून नेतृत्व घडविण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
तेंव्हा नि:स्वार्थ वृत्तीने समाज हिताला प्राधान्य देणाऱ्या कणखर वृत्तीच्या मंत्री सतीश जारकीहोळी यांनाच उपमुख्यमंत्री पद दिले जावे, असे स्पष्ट मत युवा नेते रेश्मी यांनी व्यक्त केले आहे.