बेळगाव लाईव्ह :केंद्र सरकारने ‘हिट अँड रन’ संदर्भात लागू केलेला नवा कायदा अन्यायकारक असून तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा ट्रक व लोरी चालक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळगाव जिल्हा ट्रक व लोरी चालक संघटनेतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवार सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना जिल्हा ट्रक -लॉरी चालक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने केंद्र सरकारने हीट अँड रन संदर्भात जो नवा कायदा काढला आहे तो आम्हा अवजड वाहन चालकांवर अन्याय करणार आहे.
हिट अँड रन गुन्ह्यात 7 लाखाचा दंड आणि 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद अतिरेकी आहे. यासाठी आम्ही ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलन छेडून संप पुकारला आहे. सदर नवा कायदा तात्काळ मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे असे संबंधित पदाधिकाऱ्याने सांगितले.
निवेदन सादर करतेवेळी बेळगाव शहर परिसरातील बहुसंख्य ट्रक व लॉरी चालक उपस्थित होते. या सर्वांनी केंद्र सरकारकडून हिट अँड रन संदर्भातील नवा कायदा जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.