बेळगाव लाईव्ह :साध्या सिंगल गिअर 22 इंची सायकलवरून अवघ्या आठ दिवसात बेळगाव ते कन्याकुमारी हा 1200 कि.मी. अंतराचा दीर्घ प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करणे ही असामान्य कामगिरी बेळगावचे सायकलपटू रमेश गोवेकर यांनी केली आहे. आपल्या या कामगिरीद्वारे गोवेकर यांनी अटल निर्धार आणि सायकल चालवण्याची प्रचंड आवड काय आगळे घडवू शकते याचे एक चमकदार उदाहरण घालून दिले आहे.
वेणूग्राम सायकलींग क्लबचे सदस्य आणि व्यावसायिक असलेले रमेश गोवेकर यांचा क्लबच्या गोवा, तिलारी, शिरोडा, पंढरपूर, दांडेली वगैरे ठिकाणच्या दीर्घ सायकलिंग मोहिमांमध्ये कायम सहभाग असतो.
विशेष म्हणजे इतर सायकलपटू आधुनिक गिअरच्या सायकली वापरत असताना 47 वर्षीय रमेश गोवेकर मात्र आपली नेहमीची सर्वसामान्य सिंगर गिअर सायकल घेऊन मोहिमेत सहभागी होत असतात. ही बाब त्यांच्यातील अविश्वसनीय लवचिकता आणि खेळावरील अतूट प्रेम दाखवून देणारी आहे.
गोवेकर यांच्याकडे असलेली 22 इंची हिरो सायकल ही त्यांचे मामा नारायण बाळेकुंद्री यांनी त्यांना दिली आहे. तीन-चार दशकांपूर्वीच्या या सायकलवरून अवघ्या आठ दिवसात 1200 की.मी. सायकलिंग करण्याची जी असमान्य कामगिरी रमेश यांनी केली आहे ती त्यांच्या प्रचंड अशा शारीरिक आणि मानसिक क्षमतेची प्रचिती आणून देण्याबरोबरच निखळ इच्छाशक्तीचे प्रदर्शन घडवणारी आहे.
शहरातील कंग्राळ गल्ली येथील रहिवासी असलेल्या रमेश गोवेकर यांचा हा प्रवास होतकरू उदयोन्मुख सायकलपटूंसाठी प्रेरणादायक आहे. उत्कटता, समर्पण आणि एक अविचल निर्धार असेल तर कोणत्याही आव्हानावर आपण मात करू शकतो गोवेकर यांनी दाखवून दिले आहे.