बेळगाव लाईव्ह : भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सुजित मुळगुंद या सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीमुळे दक्षिण मतदार संघाचे लोकप्रतिनिधी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदारांच्या बेकायदेशीर संपत्तीचे प्रकरण तांत्रिक त्रुटींमुळे न्यायालयाने फेटाळून लावले. यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणे गरजेचे होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. हे काम आपण केले आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी दिली.
आज याप्रकरणी बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हि माहिती दिली आहे. लोकायुक्तांकडे दक्षिण आमदारांच्या बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी सुजित मुळगुंद यांनी २०१२ साली आमदारांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या प्रकरणात तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने हे प्रकरण फेटाळण्यात आले.
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे गरजेचे होते. मात्र यासंदर्भातही दुर्लक्षच झाले. हि बाब लक्षात घेऊन आपण सर्वोच्च न्यायायलात दाद मागितली आणि सर्वोच्च न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आमदारांना नोटीस बजावली आहे.
आपण हि तक्रार व्यक्तीविरोधात केली नसून भ्रष्टाचाराविरोधात केली असल्याचेही सुजित मुळगुंद यांनी स्पष्ट केले आहे.