Sunday, January 5, 2025

/

गोवावेस पेट्रोल पंप जागेच्या निविदेला अडथळा

 belgaum

बेळगाव लाईव्ह:मनपाच्या जागेतील गोवावेस येथील पेट्रोल पंपाच्या निविदेचा मुद्दा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. सध्या महानगरपालिकेची जागा लिजवर घेतलेल्या विद्यमान लिजधारकाने निविदा प्रक्रियेवरच स्थगिती आणण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक वर्षे हा पेट्रोल पंप बंद होता. कोविड काळाच्या पूर्वी या ठिकाणी पेट्रोल पंप चालवण्याचे कंत्राट घेण्यात आले. भारत पेट्रोलियमच्या लायसन्स खाली महानगरपालिकेच्या जागेत पेट्रोल पंप सुरू होता.दरम्यान काही कारणांनी हा पेट्रोल पंप बंद झाला होता या परिस्थितीत महानगरपालिकेने पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवून नव्याने पेट्रोल पंप चालवण्यास देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू केली होती. मात्र मूळ लिजधारकाने या संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे आता निविदा प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

जुन्या लिज धारकाचे शिल्लक भाडे आणि पेट्रोल कंपनीच्या काही अटी दूर न करताच महानगरपालिकेने ही निविदा प्रक्रिया राबवली असल्याची माहिती मिळाली आहे. बऱ्याचशा गोष्टीचे निराकरण न करता या पद्धतीने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा प्रकार आता महानगरपालिकेला अंगलट येणार की काय अशी परिस्थिती आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयात महानगरपालिकेला तसेच मुळ लिज धारकाला आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसाची मुदत देण्यात आली असून सोमवार पर्यंत निविदा ग्राह्य की बाद याबद्दलचा निर्णय जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या तरी निविदा प्रक्रिया अडचणीत आली असून त्यावर स्थगिती मिळाल्यास निविदा प्रक्रियेला अनेक अडथळे येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महानगरपालिकेतील काही सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार जुन्या लिज धारकाचा प्रश्न सोडवल्याशिवाय अशाप्रकारे नवीन निविदा काढता येत नाही, मात्र महानगरपालिकेच्या काही मंडळींनी याबाबतीत गडबड केली असून त्यामुळे आता पूर्ण निविदा प्रक्रियाच अडचणीत येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता कर्नाटक उच्च न्यायालय या प्रकरणी कोणता निर्णय देते यावर निविदेचे भवितव्य ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.