बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्राने आपली जन आरोग्य योजना राबवण्यासाठी बेळगावसह कर्नाटकच्या सीमाभागात प्रवेश करू नये असे आम्ही महाराष्ट्र शासनाला कळविले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
बैलहोंगल तालुक्यातील संगोळ्ळी येथे मोठ्या विस्तृत जागेमध्ये क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सैनिक स्कूल तसेच अन्य विकास कामांचा भूमिपूजन व कोनशीला समारंभ आज बुधवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पार पडला.
त्यानंतर पत्रकारांनी सीमा भागातील 865 गावांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य विमा योजने संदर्भात प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त माहिती दिली.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सैनिक स्कूल उभारण्याचा उद्देश स्पष्ट करण्याबरोबरच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा आणि वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती दिली. त्याचप्रमाणे सदर 110 एकर जागेमध्ये क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सैनिक स्कूल उभारण्याबरोबरच उद्यान, संग्रहालय आदींची ही निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांनी महाराष्ट्राच्या जन आरोग्य योजने संदर्भात विचारणा केली असता आपली भूमिका व्यवस्थित स्पष्ट करण्याऐवजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आमच्या मुख्य सचिवाने महाराष्ट्र शासनाला कर्नाटक हद्दीत प्रवेश करू नये असे कळविले आहे, इतकेच सांगून लगबगीने पत्रकारांच्या गर्दीतून काढता पाय घेतला.