बेळगाव लाईव्ह:सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आरोग्य दूतांनी महाराष्ट्र शासनाची आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी बाबतची माहिती प्रत्येक गावागावातील मराठी माणसांच्या घराघरापर्यंत पोहोचवावी. सीमा भागातील मराठी बांधवांच्या आरोग्याच्या कठीण काळात महाराष्ट्र शासनाची ही आरोग्य योजना निश्चितपणे एक जीवनदायींनी म्हणून कार्य करेल, असा मला विश्वास आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मोफत उपचाराची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी यासंदर्भात आज गुरुवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने म्हणाले की, सीमाभागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी वगैरे 865 गाव ही सातत्याने महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत आणि आता या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येथील मराठी माणसांसाठी आरोग्य योजनेच्या स्वरूपात सुखद बातमी, आनंदाची भेट दिली आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष पद दिले.
महाराष्ट्र कर्नाटक यांच्यातील सीमा वादाचे न्यायालयामध्ये व्यवस्थित सादरीकरण होते की नाही? हे पाहण्याची, त्यात व्यवस्थित समन्वय राखण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. उच्चाधिकार समितीची पहिलीच बैठक मुंबईत झाली आहे. महाराष्ट्राचा माणूस हा फक्त महाराष्ट्रासाठी मर्यादित नाही तो सीमाभागाच्या पलीकडेही राहतो याचा मूर्तीमंत उदाहरण महाराष्ट्रातील आरोग्य सेवा सीमावासीयांपर्यंत पोहोचवण्याद्वारे घडवून आणले आहे. सीमा भागातील मराठी माणसांना फक्त भाषेचे आश्वासन न देता कृतीच्या माध्यमातून त्याच्या पाठीशी उभे राहण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे. यासाठी उच्च अधिकार समितीचा अध्यक्ष या नात्याने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो.
परवाच्या उच्च अधिकार समितीच्या बैठकीस रमाकांतदादा कोंडुसकर, रणजीत चव्हाण -पाटील वगैरे सर्वच मंडळी होती. ही पहिलीच वेळ आहे की एका राज्य शासनाने एखाद्या समितीला अशा पद्धतीचे अधिकार दिले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात शासन टू शासन असे कार्य झाले आहे. मात्र मध्यवर्तीय समिती हीच आमचे शासन अशा भूमिकेतून महाराष्ट्र राज्य शासनाने हा एक क्रांतिकारी निर्णय घेतला. तसेच यातून सीमा लढ्याला बळकटी देण्याचा संदेशही पोचविण्यात आला. सीमा भागातील मराठी माणसाच्या मागे महाराष्ट्र शासन ठामपणे उभे आहे हे सांगण्यासाठी हे महत्त्वाकांक्षी पाऊल मुख्यमंत्री शिंदे यांनी उचललेला आहे. आता महाराष्ट्र शासनाचे आरोग्य दूत म्हणून समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्य करायचं आहे. मंगेश चिवटे, मालवे आणि त्यांची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सीमा भागासाठी असलेले महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री शंभूराज देसाई व चंद्रकांत पाटील ही सर्व मंडळी आम्हाला आमच्या कार्यात मदत करतच आहेत. माझा स्वतःचा जिव्हाळा या सर्व सीमाभागाशी, येथील मराठी लोकांशी, येथील प्रश्नाशी आहे, असे खासदार माने यांनी सांगितले.
सीमा प्रश्नाच्या सोडविणेकीसाठी आमची कायदेशीर लढाई सुरूच आहे. त्याचबरोबर इथल्या माणसाला सुदृढ आरोग्याची देणं देन हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं होतं. प्रसंगाला उभा राहतो तोच परमेश्वर. शासन एक योजना देते म्हणजे नागरिकांच्या प्रसंगाला उभे राहते. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रातील आरोग्य सेवेसाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारशीची जी अट आहे. तिची पूर्तता करण्यासाठी खासदार आणि उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष या नात्याने असलेले माझे स्वाक्षरी केलेले कोरे लेटर पॅड मी देण्यास तयार आहे. जेणेकरून सीमा भागातील मराठी बांधवांच्या आरोग्य सेवेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये. या पद्धतीने आरोग्य दूत म्हणून काम करण्याची संधीही मला मिळेल असे सांगून पत्रकार बंधू, प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्र शासनाची ही आरोग्य योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.
सदर योजना समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचली तरच खऱ्या अर्थाने तिचा उद्देश सफल होणार आहे. सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आरोग्य दूतांनी या आरोग्य योजनांची माहिती प्रत्येक गावागावातील मराठी माणसांच्या घराघरापर्यंत पोहोचवावी. सीमा भागातील मराठी बांधवांच्या आरोग्याच्या कठीण काळात महाराष्ट्र शासनाची ही आरोग्य योजना निश्चितपणे एक जीवनदायींनी म्हणून कार्य करेल, असा मला विश्वास आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आता दुहेरी भूमिका घ्यायला हवी. सीमा प्रश्नाचा लढा एकीकडे सुरू असला तरी आता त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आरोग्य दूत म्हणून देखील कार्य करावे. ही आरोग्य योजना म्हणजे नकळत सीमाभागातील 865 गावांना दिलेला संदेश आहे की येथील मराठी बांधव हे आमचे आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी देखील आमची आहे. ती जबाबदारी इमाने इतबारे प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राजकारणाच्या सीमेबाहेर जाऊन माणुसकीच्या दृष्टिकोनातून ते कार्य करतात याचा मला अभिमान आहे. त्यांचं हे पाऊल मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी आहे. खरंतर या नववर्षात सीमा भागातील मराठी बांधवांना या आरोग्य योजनांची गरजच पडू नये. त्यांचे आरोग्य क्षेमकुशल रहावे, मात्र जर गरज पडली तर महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वरूपात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हा संदेश देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत, असे खासदार धैर्यशील माने यांनी शेवटी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत प्रसंगी महाराष्ट्रातील शिवसेना आरोग्य विभाग प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण -पाटील, विकास कलघटगी सागर पाटील, शंकर बाबली, कपिल भोसले आदी उपस्थित होते.