बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील विविध दलित संघटनांच्यावतीने शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढून भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला.
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहरातील विविध दलित संघटनांतर्फे आज सकाळी सर्वप्रथम धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
यावेळी दलित कार्यकर्त्यांनी महाराजांचा जयजयकार करून परिसर दणाणून सोडला होता. महाराजांना अभिवादन केल्यानंतर मोटरसायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरवून ही मोटरसायकल रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यानात समाप्त झाली.
त्या ठिकाणी आयोजित भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमात दलित नेत्यांनी आपले समयोचीत विचार व्यक्त केले. त्याचप्रमाणे यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध दलीत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
भीमा कोरेगाव शौर्य दिन मोटरसायकल रॅलीला प्रारंभ होण्यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दलित नेते मल्लेश चौगुले यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून आम्ही नव्या वर्षाची सुरुवात करत आहोत.
आजच्या दिवशी आपल्या देशातील ऐतिहासिक असे भीमा कोरेगाव युद्ध झाले होते. या युद्धाला आज 2600 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त भीमाकोरेगाव येथे आयोजित कार्यक्रमास संपूर्ण देशासह विश्वातून लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावली आहे. पेशव्यांविरुद्ध 31 डिसेंबर रोजी रात्री भीमा कोरेगाव युद्ध झालं. त्या युद्धाचे स्मरण आज देखील केले जाते.
त्या अनुषंगाने आज आम्ही शहरातील विविध दलित संघटनांच्यावतीने धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन करून मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. भीमा कोरेगाव युद्ध हे आमच्यासाठी प्रेरणा ज्योत आहे.
ही ज्योत आम्ही सदैव तेवत ठेवणार आहोत असे सांगून चौगुले यांनी छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत बसवेश्वर, भगवान गौतम बुद्ध यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या आचार विचारांचे आजच्या पिढीने आचरण करणे गरजेचे आहे तसे झाले तरच संपूर्ण समाजाचे भले होईल, असे चौगुले म्हणाले