बेळगाव लाईव्ह :अनमोड मार्गे बेळगाव ते पणजी रस्त्याचे प्रलंबित असलेले विकासकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या 3 महिन्यात पूर्ण केले जावे, असे निर्देश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत.
सदर निर्देशामुळे खानापूर तालुक्यातील होनकल क्रॉस येथून कर्नाटक -गोवा हद्दी जवळील अनमोडपर्यंत विस्तारित बेळगाव ते पणजी महामार्गाचे काम संबंधित कंत्राटदारासाठी कोणत्याही परिस्थितीत 3 महिन्यात पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. अनमोड मार्गे बेळगाव -पणजी राष्ट्रीय महामार्गचे प्रलंबित असलेले काम कंत्रालदाराने तात्काळ पूर्ण करण्याची गरज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक भुवनेश्वर कुमार यांनी गेल्या गुरुवारी अधोरेखित केली आहे.
भुवनेश्वर कुमार यांनी आपल्या खात्यातील अधिकारी आणि अभियंत्यांसमवेत अनमोड ते होनकल दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सदर महामार्ग संदर्भातील करार महाराष्ट्रातील एका कंपनीशी झाला असल्याची माहिती दिली.
तसेच करार झालेल्या त्या कंपनीने रस्त्याचे काम दुसऱ्या कंत्राटदाराला दिल्यामुळे ते पूर्ण होण्यास विलंब झाला आहे. दोन्ही कंत्राटदारांमध्ये संरेखन आणि समन्वयाच्या अभावामुळे कामाकडे दुर्लक्ष होऊन प्रकल्प रखडला असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. सदर मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोयीची केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेतली आहे.
त्यांच्याच निर्देशावरून भुवनेश्वर कुमार यांनी गेल्या गुरुवारी सदर महामार्गाच्या विकास कामाची पाहणी केली. तसेच संबंधितांना या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली आहे.