Friday, October 18, 2024

/

बेळगावचे मराठे म्हणतात.. जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुंबई येथे उपोषण करण्याचा निर्णय मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी घेतला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज बेळगाव यांच्यावतीने आज शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आयोजित लाक्षणिक उपोषण उत्स्फूर्त प्रतिसादात शांततेत पार पडले.

सिव्हिल हॉस्पिटलसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आज सकाळी सर्वप्रथम महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सकल मराठा समाजाचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपोषणाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, रमाकांत कोंडूस्कर,ॲड. अमर येळ्ळूरकर, गुणवंत पाटील, सागर पाटील, महादेव पाटील, हभप शंकर बाबली महाराज,माजी महापौर शिवाजी सुंठकर सुनील जाधव धनंजय पाटील, प्रशांत भातकांडे, विकास कलघटगी, दीपक पावशे,अमित देसाई,गोपाळ बिर्जे, पी जे घाडी,कपिल भोसले, विठ्ठल नाकाडी, विजय भोसले मनोहर हलगेकर, आदींसह बहुसंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते. सकल मराठा समाजाच्या आज दुपारी 3 वाजेपर्यंत चाललेल्या लाक्षणिक उपोषणात दलित संघटनेचे प्रमुख मल्लेश चौगुले यांच्यासह अन्य दलित अधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शविला.

यावेळी बोलताना यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी आंदोलन उभारले आहे. त्यांची मागणी आणि त्यांच्या आंदोलनासाठी बेळगावसह सीमा भागातील 865 गावातील मराठा समाज नव्हे तर जगातील संपूर्ण मराठा समाज आज त्यांच्या पाठीशी उभा आहे. खरं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. आमचे म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य संविधानाने आम्हाला दिले आहे. परंतु आजची परिस्थिती पाहता मराठा समाजासह समाजातील अन्य घटकांवर नोकरी, शिक्षण, व्यवसाय वगैरेंच्या माध्यमातून अन्याय होत चालला आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी मनोज जरांगे -पाटील यांनी आंदोलन छेडले आहे. यासाठी आमचा समस्त मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे असे मी जाहीर करतो असे सांगून येत्या काळात आम्ही त्यांच्याबरोबर राहून पुढे कार्य करू अशी ग्वाही मी आज मनोज जरांगे पाटील यांना देतो असे कोंडुसकर यांनी सांगितले.Maratha resr

ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी आरक्षणाबद्दल माहिती दिली. मुळात आरक्षण म्हणजे काय समजून घ्यायचे झाल्यास आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आणि म्हणूनच माणसाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी हे आरक्षण आहे. आरक्षण म्हणजे कोणताही कमीपणा नाही. एखाद्या शासकीय योजनेमध्ये अथवा नोकरीमध्ये तुम्हाला जर संधी मिळत नसेल तर तशा समाजांना आरक्षण देऊन समानतेचा हक्क दिला जावा यासाठी डॉ. आंबेडकर यांनी देशाच्या संविधानात तरतूद केली आहे, असे ॲड. येळ्ळूरकर यांनी सांगितले.

दलित नेते मल्लेश चौगुले म्हणाले की जेव्हा मोठा भाऊ रस्त्यावर उतरतो तेव्हा लहान भावाने देखील त्याला साथ दिली पाहिजे. आज आपल्या देशात छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले हे झाले नसते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे थोर पुरुष घडले नसते. पर्यायाने आम्हीही घडलो नसतो. आपल्याला थोर परंपरा आहे. महाराष्ट्रातील आमचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यापूर्वीच जाहीर केले आहे की जिथे जिथे आमच्या दलित संघटना आहेत त्यांनी आरक्षणासाठी मराठा समाजाला पाठिंबा द्यावा. आम्हाला देखील त्यांनी तशी सूचना केली आहे. आजपर्यंत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात मराठा समाजाचा मोठा विकास व्हावयास हवा होता, मात्र दुर्दैवाने तसे घडलेले नाही. मराठा समाजाप्रमाणे दलित समाजाचे देखील जसे कल्याण व्हावयास हवे होते ते झालेले नाही. त्यामुळे आरक्षणासाठी महाराष्ट्र असू दे अथवा कर्नाटक जिथे जिथे मराठा समाज उभा राहील त्या ठिकाणी दलित संघटना संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहतील याची मी ग्वाही देतो. या लाक्षणिक उपोषणात देखील आम्ही सहभागी होत आहोत. जरांगे -पाटील यांच्यामुळे संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे येण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी दलित संघटना त्यांच्या पाठीशी आहेत असे सांगून जिथे शिवराय आहेत तिथे भीमराय आहेत. तेंव्हा या लाक्षणिक उपोषणाला आमच्या सर्व दलित संघटनांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे मल्लेश चौगुले यांनी जाहीर केले.

शिवशक्ती भिम शक्तीची एकजूट

महाराष्ट्रातील दलित नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार बेळगावत सकल मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते त्या उपोषणासाठी बेळगाव येथील दलित बांधवांनीही पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला.

यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले यांच्यासह आदींनी सहभाग घेत घोषणाबाजी करत आपण मराठा समाजाच्या नेहमी पाठीशी आहोत आणि शिवशक्ती भीमशक्ती हे भविष्यात देखील एकत्र राहतील आणि शाहू फुले आंबेडकरांचा शिकवणीचा पुरस्कार करील असे सांगितले.

मागील वर्षी बेळगाव रेल्वे स्थानकावर शिवशक्ती भीमशक्ती एकवटल्याने छत्रपती शिवरायांचे आणि  डॉ आंबेडकरांचे तैलचित्र बसवले होते त्याची आठवण यावेळी करून देण्यात आली आणि भविष्यात देखील शिवशक्ती यांनी भीमशक्ती एकवटल्यास बेळगावात नक्कीच इतिहास घडेल असे यावेळी नमूद करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.