बेळगाव लाईव्ह:कोकटनूर (ता. अथणी) येथील श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेप्रसंगी प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर बंदी घातली जावी, अशी मागणी विश्वप्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष प. पू. श्री दयानंद स्वामीजी यांनी केली आहे.
बेळगाव सर्किट हाऊस येथे आज शनिवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना श्री दयानंद स्वामीजी म्हणाले की, अथणी तालुक्यातील कोकटनुर येथील श्री यल्लमा देवीची यात्रा सुरू होत आहे.
या यात्रेला कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील लाखो भाविक हजेरी लावून देवीचे भक्तीभावाने दर्शन घेऊन पूजा, अभिषेक वगैरे धार्मिक विधी करतात. याबरोबरच यात्रेच्या निमित्ताने अनेक भाविक देवाच्या आणि धर्माच्या नावावर प्राण्यांचा बळी देतात.
या प्रथेवर 1959 च्या प्राणी बळी कायद्याअंतर्गत बंदी घातली गेली पाहिजे. आयुध पूजा आणि विजयादशमीच्या निमित्ताने कक्केरी (ता. खानापूर) गावातील श्री बिष्टा देवी यात्रेप्रसंगी हजारो प्राण्यांचा बळी दिला जात होता.
मात्र पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही अनिष्ट प्रथा बंद करण्यात विश्वप्राणी कल्याण मंडळ आणि पशु प्राणी बळी निर्मूलना जागृती महासभेला संपूर्ण यश आले आहे.
यासाठी मी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देतो. कक्केरी प्रमाणे कोकटनूर येथील यात्रेतील पशुबळी प्रथेवर देखील बंदी घातली गेली पाहिजे, असे स्वामीजी म्हणाले. पत्रकार परिषदेस विश्व प्राणी कल्याण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.